मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या दिवशी भाषण असतं त्या दिवशी माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि हातापायाला घाम फुटतो असं म्हटलं आहे. तसेच असं का होतं याचं कारणही सांगितलं आहे. ते रविवारी (१९ फेब्रुवारी) मुंबईतील मुलुंड येथे व्हीजेटीआय महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.

बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा वारसा कसा आत्मसात केला? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला मी काय सांगू. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मी जे बोलतोय ते सत्य आहे. मी भाषणाला जेव्हा केव्हा उभा राहतो किंवा ज्या दिवशी मला भाषण द्यायचं असतं त्यासारखा वाईट दिवस माझा कुठलाच जात नाही. माझ्या पूर्ण हाताला मुंग्या आलेल्या असतात. हातपाय थंड पडतात, हातापायाला घाम फुटलेला असतो.”

“भाषणाआधी मला घाम फुटतो कारण मी काय बोलणार हे मला माहिती नसतं”

“याचं एकमेव कारण म्हणजे मी काय बोलणार हे मला माहिती नसतं. मी कित्येकदा भाषणासाठी काही नोट्स काढून गेलो. त्या पोडिअमवर लावल्या. मात्र, भाषणात नोट्समधलं सोडून सगळं बोललो,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला ठरवून भाषण करता येत नाही आणि मी केलंही नाही”

“माझ्या कुलदैवतांची, घरच्यांची कृपा असेल, पण मला ठरवून भाषण करता येत नाही आणि मी केलंही नाही. त्यामुळे माझ्या भाषणाच्या पद्धतीला फॉलो करू नका. मला जे मनातनं वाटतं ते मी बोलत जातो. मला वाटते ती गोष्ट मी सांगतो,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.