स्वदेशीसह युरोपीय प्रभाव असलेला ‘राज’वाडा; ‘शिवतीर्थ’मधील खास कलाकृती पाहिल्यात का?

दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या घरात प्रवेश केला. पाहा त्यांच्या घरातील काही खास फोटो

Raj Thackeray New Home Art
विजय राऊत यांनी शेअर केले काही खास फोटो (फोटो विजय राऊत यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)

दिवाळीच्या निमित्ताने भाऊबीजेच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या घरात प्रवेश केला. त्यांचं आधीचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच हे नवं पाच मजली घर असणार आहे. ‘शिवतीर्थ’ असं त्यांच्या नव्या घराचं नाव आहे. हे घर सर्व सोयीसुविधांनी युक्त आहे. या घराचं पूजन आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मात्र राज ठाकरेंच्या नवीन घरामध्ये त्यांच्यातील कलाकाराची स्पष्ट झलक दिसून येत असल्याचे सांगणारे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. राज यांच्या नवीन घरातील हे पहिलेच काही फोटो आहेत. हे फोटो फेसबुकवर राज यांचे निकटवर्तीय असणाऱ्या विजय राऊत यांनी शेअर केले आहेत.

सहा नोव्हेंबर रोजी विजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या नव्या घरामधील काही खास फोटो त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरुन शेअर केले आहेत. विजय म्हणतात, “आज कृष्णकुंज वरून राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी शिवतीर्थावर अत्यन्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या साक्षीने गृहप्रवेश केला. राज ठाकरे हे स्वतः कलावंत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनोख्या स्टाईलने हे शिवतीर्थ सजविले आहे. ज्याचे दर्शनच यूरोपीय प्रभाव असलेल्या दरवाजातून आणि हत्तीच्या स्वागताने आत गेलो की प्रथम दर्शन होते ती चांदीत नक्षीकाम केलेल्या गणेशाने आणि मग शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या राजाने रयतेसोबत कसे वागावे या आशयाच्या पत्राने.ही अप्रतिम पत्र कलाकृती अनुप चिटणीस यांनी तयार केलेली आहे.”

“याच कलाकृतीच्या अगदी समोर एक पेंटिंग आहे ज्यात प्रबोधनकार ठाकरे ,बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांची रेखाटने आहेत. ही विजय राऊत यांनी कॅनव्हासवर तयार केलेली कलाकृती आहे. एक बाजूला शिवाजी महाराजांचे एक भव्य ऑइल कलरमधले पेंटिंग आहे. हे वासुदेव कामत यांचे ऑइल पेंटिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला १९४५ ते २०२१ सालातले शिवाजीपार्क आहे. बाजूला राज ठाकरे यांनी आजवर जोपासलेली पुस्तके आणि फिल्म सीडीजचे संग्रहालय आहे. अगदी वेगळ्या थाटात, हवं तर याला राज साहेबांची गुहाच म्हणा. यात पण एक पेंटिंग आहे किंगडम नावाचे ज्यात मध जमा करीत असलेल्या मधमाश्या आहेत जे अगदी या वास्तूला समर्पक आहे. ही कलाकृती विजय राऊत यांनी तयार केली आहे,” असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच पुढे लिहिताना राऊत म्हणतात, “पाचव्या मजल्यावर वॉल्ट डिस्ने यांच्या कलाकृतींचा संग्रह आहे आणि समोर भव्य दिव्य टेरेस. समोर जे दिसते त्यावर विश्वास बसणार नाही असा शिवाजी पार्कचा नजारा आहे. हा नजारा आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो.”

पोस्टच्या शेवटी राऊत यांनी, “थांबा आता मी या संपूर्ण वास्तूचे पूर्ण वर्णन करणार नाही कारण जे आहे ते खरोखर अवर्णनीयच आहे. थोडक्यात राज ठाकरे यांच्या स्वप्नातील हा एक यूरोपीय प्रभाव असलेला भव्य दिव्य शिवतीर्थ नावाचा राजवाडा आहे. अश्या या राजवाड्याच्या उदघाटन प्रसंगाचा मी एक राज ठाकरे यांच्या जवळचा साथीदार म्हणून साक्षीदार होतो हे मी माझे भाग्य समजतो. या राजवाड्यात माझ्या काही कलाकृती आहेत हे त्याहूनही मला मिळालेली मोठी संधी आहे असे मी समजतो,” असं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackery moves in to his new home shivtirtha have look at inside photos scsg

Next Story
एसटी संपाचा तिढा कायम ! ; निम्म्याहून अधिक आगारांमधील कामगारांचा सहभाग; प्रवाशांचे हाल
फोटो गॅलरी