मनसेचे माजी आमदार व सरचिटणीस प्रवीण दरेकर यांच्यासह चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू असताना दरेकर यांनी शनिवारी दुपारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून भाजप व शिवसेनेची रणनीती आखली जात असल्यामुळे दरेकर यांच्या या उद्धव भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रवीण दरेकर यांनी मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. तो स्वीकारताना राज यांनी त्यांच्याशी कोणीही संपर्क ठेवू नये, असे आदेश मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. भाजपचा वाढता प्रभाव व आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मनसेचे चार माजी आमदार हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे. दरेकर यांनी यापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांचीही भेट घेतली होती. मात्र, शनिवारी दरेकर यांनी उद्धव यांची भेट घेऊन त्यांच्याशी शिवसेना प्रवेशाबाबत बोलणी केल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विभाग प्रमुख विनोद घोसाळकर यांचा पराभव प्रामुख्याने गुजराती मतदारांमुळे झाल्याचे लक्षात घेऊन मुंबईतील मराठी मते एकवटण्याकडे शिवसेनेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले विनोद तावडे यांना मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी पश्चिम उपनगरात आपली ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उद्या महापालिका निवडणूक सेना-भाजपने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय झाल्यास मनसेतील नाराज पण प्रभावी लोकांचा उपयोग शिवसेनेला होऊ शकतो, हे लक्षात घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेकडे वळविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns dissident pravin darekar meet shiv sena president uddhav thackeray
First published on: 28-12-2014 at 02:43 IST