मालिकांच्या शूटिंगसाठीच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा न करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं इशारा दिला आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मराठी मालिकेच्या सेटवरील २७ कलाकार व क्रू मेंबर्संना करोनाची लागण झाली. याच मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे निधन झाले. हलगर्जीपणामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राज्यातील लॉकडाउनमुळे गेले अनेक महिने मालिका तसंच सिनेमांचे चित्रीकरण पूर्णपणे बंद होते. मनोरंजन सृष्टीतील अनेक नामवंतांनी चित्रीकरणास सशर्त परवानगी मिळावी अशी मागणी वारंवार केल्यामुळे अखेर राज्य सरकारने कोविड प्रोटोकॉलचे पालन करून शूटिंग करण्याची अट निर्मात्यांना घातली होती. दुर्दैवाने, मराठी तसंच हिंदीतील विविध मनोरंजन वाहिन्यांचे संचालक आणि मालिकांचे निर्माते कोविड प्रोटोकॉलला पुरेशा गांभीर्याने घेत नसल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता ज्या मालिकेत काम करत होत्या, त्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यात हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी प्रशासन करेलच, मात्र आपल्या मनोरंजन वाहिनीच्या तसंच निर्मितीसंस्थेच्या मालिकांच्या सेटवर कोविड प्रोटोकॉलचे सर्वतोपरी पालन करणे, ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, याचं भान प्रत्येक मनोरंजन वाहिनीने तसंच मालिकांच्या निर्मात्यांनी बाळगायला हवं. कोविड प्रोटोकॉलच्या पालनात कोणतीही तडजोड किंवा हलगर्जी केल्यामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर ‘मनचिसे’ मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल’, असं खोपकरांनी स्पष्ट केलं.

‘आई माझी काळूबाई’ मालिकेच्या सेटवरील अनेकांना करोनाची लागण झाल्याने १५ सप्टेंबर रोजी मालिकेचं चित्रीकरण थांबवण्यात आलं. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यामध्ये पार पडत होतं. मात्र आता मुंबईतील फिल्म सिटीमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं समजतंय.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader amey khopkar on 27 tests covid positive on aai majhi kalubai set ssv
First published on: 22-09-2020 at 18:04 IST