राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा असे मत नाइट लाइफबद्दल बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मात्र आदित्य ठाकरे यांच्या या मागणीवरुनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे. “तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार त्या खात्याचा वेगळा अर्थसंकल्प आवश्य वाटतो पण महिलांच्या अधिकारांसंदर्भातील अर्शसंकल्प गरजेचा वाटत नाही,” असा टोला शालिनी ठाकरेंनी ट्विटवरुन लगावला आहे.

आदित्य ठाकरे नक्की काय म्हणाले?

सोमवारी आदित्य ठाकरेंनी ठाण्यातील ‘संस्कृती आर्ट फेस्टिवल’ला हजेरी लावली. या वेळेस बोलताना आदित्य यांनी, “पर्यटन विभागात आधी उत्साह नव्हता. मात्र, माझ्याकडे खाते आल्यानंतर या विभागात उत्साह आल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात जी कामे हाती घेतली आहेत, ती उत्तम आणि दर्जेदार करण्यात येणार आहेत. मुंबई शहरात सुरू केलेल्या रात्रजीवन (नाइट लाइफ) कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत आढावा घेतल्यानंतरच ही संकल्पना ठाण्यात राबविण्याचा विचार करू. तसेच आमदारांच्या मागण्या विचारात घेता पर्यटन खात्यासाठी वेगळा अर्थसंकल्प असावा,” असं मत व्यक्त केलं.

आणखी वाचा – मुंबईतील प्रतिसाद पाहून ठाण्यात रात्रजीवन

शालिनी ठाकरेंचा टोला…

शालिनी ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘मुंबईतील प्रतिसाद पाहून ठाण्यात रात्रजीवन’ या बातमीच्या फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉर्ट ट्विटवरुन शेअर करत आदित्य यांच्यावर टिका केली. “व्वा रे व्वा! तुम्ही ज्या खात्याचे मंत्री बनणार, त्या खात्याचा ‘वेगळा’ अर्थसंकल्प तुम्हाला आवश्यक वाटतो पण महिलांच्या न्याय्य अधिकारांबाबत विशेष अर्थसंकल्प, जेंडर बजेट सादर करून त्वरित अंमलबजावणी करणं तुम्हाला गरजेचं वाटत नाही,” असा टोला शालिनी ठाकरेंनी लगावला आहे. तसेच ट्विटच्या शेवटच्या ओळीत त्यांनी, “तुमच्या या ‘अनास्थेचा हिशोब’ महिलांना मांडावाच लागेल,” असा इशाराही आदित्य यांना दिला आहे.

मुंबईकरांनी फिरवली पाठ

एकीकडे आदित्य यांनी ठाण्यातील नाइट लाइफबद्दल वक्तव्य केलं असतानाच दुसरीकडे मुंबईतील नाइट लाइफला मुंबईकरांनी थंड प्रतिसाद मिळाला आहे. युरोप-अमेरिकेप्रमाणे मुंबईकरांनाही रात्री उशिरापर्यंत खरेदी आणि पेटपुजेचा आनंद लुटता यावा यासाठी सुरू झालेल्या ‘मुंबई २४ तास’ला ग्राहकांकडून महिनाभरानंतरही थंड प्रतिसाद आहे. त्यामुळे ज्या काही मोजक्या व्यावसायिकांनी सुरुवातीच्या दिवसात या संकल्पनेला पाठिंबा दर्शवला होता, त्यांचाही मध्यरात्री दुकाने खुली ठेवण्याचा उत्साह आटला आहे. त्यामुळे महिनाभरानंतरही रात्रीची मुंबई शांतच आहे.

आणखी वाचा – रात्रीची मुंबई शांतच!

‘मुंबई २४ तास’ला थंड प्रतिसाद

‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना सुरुवातीला आठवडाभर न राबविता ‘विकेंड’पुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. ग्राहक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मॉलमध्ये रात्री उशिरा येऊन खरेदी करतील अशी आशा होती. मात्र त्याला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद लाभला नाही. मागील एक महिन्यापासून राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. गेल्या आठवडय़ात शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्री मॉलमधील सर्व दालने नेहमीप्रमाणे रात्री ११ पर्यंत बंद झाल्याचे दिसत आहे.