राज्यातील विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांची उमेदवारीची घोषणा सर्वात लक्षवेधी ठरली. आदित्य यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. यामुळे ठाकरे कुटुंबासाठी ही निवडणूक विशेष असणार आहे. दरम्यान काका राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून समर्थन केलं आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एबीपी न्यूजच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं.

“प्रत्येकाचं आपलं एक मत आहे. निवडणूक लढण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंचा आहे आणि मी त्याचं समर्थन करतो,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. “उद्या माझ्या मुलाला निवडणूक लढवायची असेल, त्याला खात्री असेल तर मी नाही म्हणणार नाही,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी उदाहरण देत सांगितलं की, “दिवंगत बाळासाहेब ठाकरे एक व्यंगचित्रकार होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी हात खराब होईल म्हणून त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवलं नव्हतं. पण जेव्हा मी आणि उद्धव ठाकरे मोठे झालो तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला रोखलं नाही. त्यांनी आमच्यावर काही लादण्यचा प्रयत्न केला नाही. यामुळे आम्हीही आमच्या मुलांना रोखणार नाही”. जर आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवायचं ठरवलं असेल तर त्यात चुकीचं काय ? असा प्रश्नही यावेळी राज ठाकरेंनी विचारला.

आणखी वाचा- काँग्रेसच्या चुकीच्या कारभारामुळेच भाजपा सत्तेत : राज ठाकरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात वरळीत उमदेवार दिलेला नाही. यासंबंधी बोलताना त्याच्याविरोधात उमेदवार उभा करण्यासारख्या गोष्टी मी केल्या पाहिजेत असं मला वाटत नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं. पुढे बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, “आदित्य आपला आशिर्वाद घेण्यासाठी आले नव्हते, पण आपण त्याच्या पाठीशी आहोत”. “आदित्य ठाकरे माझ्याबद्दल काय विचार करतात माहित नाही, पण माझ्याकडून ही योग्य भूमिका आहे,” असंही यावेळी राज ठाकरेंनी सागितलं.