हनुमान जयंतीच्या निमित्ताने मनसेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरतीच्या निमित्ताने राजकीय वातावरण देखील तापू लागलं आहे. मनसेनंतर शिवसेनेकडून देखील दादरमध्ये अशाच प्रकारे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं असून सदा सरवणकर यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये हनुमान जयंतीच्या महाआरतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं महाआरतीचं आयोजन केल्यानंतर त्यावरून मनसेकडून खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याहस्ते हनुमान जयंतीनिमित्त दादरच्या हनुमान मंदिरात पूजा करण्यात आली. मनसेकडून हनुमान चालीसा पठण देखील करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडेंनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं विचारताच पोलीस आमच्यासोबत असल्याचं ते म्हणाले.

“अंदर की बात है, पुलिस हमारे साथ है”

“पोलिसांवर दबाव असतो. शासकीय आहेत ते. ते त्यांचं काम करत आहेत. पण आम्हाला अंदर की बात माहिती आहे. अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र!

“पवारांची परवानगी घेतली नसेल तर…”

दरम्यान, यावेळी शिवसेनेकडून दादरमध्ये आयोजित महाआरतीवरून देखील संदीप देशपांडे यांनी टोला लगावला. “
राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी देखील महाआरतीचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हीच भूमिका त्यांनी ३ तारखेनंतर देखील कायम ठेवावी. आज महाआरती करत आहात. पण शरद पवारांची यासाठी परवानगी घेतली आहे का हे देखील तपासून घ्यावं. नाहीतर पुन्हा महाआरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

गृहमंत्र्यांना देखील खोचक सल्ला

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर देखील संदीप देशपांडेंनी टोला लगावला. “गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि मुंबई पोलीस अॅक्टचे कलम वाचावेत. ते गृहमंत्री आहेत. हे सगळं मी त्यांना सांगणं योग्य होणार नाही”, असं देशपांडे म्हणाले.