महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज संपूर्ण राज्यभरात शिवजयंती साजरी केली जात आहे. मुंबईत शिवाजी पार्कमध्येही मनसेकडून शिवजयंती साजरी केली जात असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसंच राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शपथ दिली. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेदेखील यावेळी उपस्थित होत्या. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला.
“छत्रपतींचा दिवस रोज साजरा केला तरी कमी पडेल असं राज ठाकरे सांगतात. त्यांचे विचार, आचार हे रोज लोकांना सांगितले पाहिजेत. म्हणूनच राज ठाकरेंनी आज सर्वांना शपथ दिली आहे. गेल्या दोन वर्षात करोनामुळे आम्हाला शिवजयंती साजरी करता आली नाही. पण आम्ही तिथीनुसार दरवर्षी साजरी करतो. करोनाचं संकट कमी झाल्याने यावेळी सर्वजण उत्साहाने बाहेर आले आहेत,” असं शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
“छत्रपतींनी जसं स्वराज्य स्थापन झालं तसं महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन व्हावं अशी राज ठाकरेंची इच्छा आहे. त्यामुळेच त्यांनी आज सर्वांना छत्रपतींची शपथ आपल्या भाषेत दिली,” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
शिवजयंतीवरुन वाद : मनसे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढली एकमेकांची अक्कल; जाणून घ्या नेमकं घडलं काय
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गेल्या पाच ते सात वर्षांपासून मनसेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहे. सत्तेत गेल्यापासून शिवसेनेला कदाचित विस्मरण झालं असेल. पण आम्ही सत्तेत असो किंवा नसो शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार”.
“सत्तेत असणारे सर्वजण छत्रपतींवर प्रेम करणारे आहेत. कोणी विरोध करेल असं वाटत नाही. पण तिथीनुसार साजरी का करत नाहीत हा त्यांचा प्रश्न आहे,” असंही त्यांनी म्हटलं. अमित ठाकरे विद्यार्थी सेनेला उंचावर नेतील असा विश्वास यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला.