ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम गुप्ता यांनी महापालिकेतील ‘सुस्त’ अधिकाऱ्यांची हजेरी घेण्यास सुरुवात केली असून मुसळधार पाऊस सुरू असताना आपले भ्रमणध्वनी (मोबाइल) बंद करुन आराम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘मोबाइल बंद ठेवाल तर याद राखा’, असा दम भरला आहे. यासंबंधी गुप्ता यांनी एक परिपत्रक काढले असून त्याद्वारे २४ तास आपले मोबाइल सुरू ठेवा, असा सूचना दिल्या आहेत.
या आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत मिळावी, यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोबाइल तसेच एसएमएसद्वारे माहिती देण्यात येते. मात्र, अनेक अधिकारी-कर्मचारी मोबाइल बंद ठेवून प्रतिसाद देत नसल्यामुळे असीम गुप्ता यांनी हे आदेश दिले आहेत.