सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील तिघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका महिलेचा समावेश असून अशा प्रकरणात महिलेविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाईची ही पहिलीच वेळ आहे.
सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सोनसाखळी चोरांना जरब बसावी यासाठी त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त विजय बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरी प्रकरणात अटक केलेल्या एका टोळीतील तिघांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सलमान पपली हुसेन ऊर्फ जॅकी (२६), कासिम हैदर सय्यद (२९) आणि शबाना तेहजी हुसेन (२५) अशी या तिघांची नावे आहेत. हे सर्व आरोपी ठाण्यातील आंबिवली येथे राहणारे असून सलमान पपली हा या टोळीचा म्होरक्या आहे. चोरी करून आणलेल्या मालाची शबाना विल्हेवाट लावत असे. या टोळीविरुद्ध रफी अहमद मार्ग किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात १२, तर अ‍ॅण्टॉप हिल, भोईवाडा, माटुंगा, खार, पवई, कल्याण, मानपाडा आदी विविध पोलीस ठाण्यात सोनसाखळी
चोरीचे ३० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.