तर चौकशीसाठी चार सदस्यीय समिती

मुंबई…चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेवरील दोन मोनोरेल गाड्या १९ आॅगस्ट रोजी अतिवजनामुळे मध्येच अडकल्या होत्या. त्यातील एका गाडीतील ५८८ प्रवाशांना अग्निशमन दलाने गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढले होते. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अखेर याप्रकरणी दोन उच्च पदस्थ अधिकार्यांना निलंबित केले आहे.

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळातील (एमएमएमओसीएल) मुख्य अभियंता (सिग्नल आणि टेलिकाॅम) आणि व्यवस्थापक, सुरक्षा या पदावरील अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे या घटनेच्या सखोल चौकशीसाठी महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांच्याकडून चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर मुखर्जी यांच्याकडून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबईत १९ आॅगस्टला मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका हार्बर रेल्वे सेवाला बसला. त्यामुळे मोनोरेलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. मोनोरेल गाडीची वजन पेलण्याची क्षमता १०४ मेट्रीक टन असताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी चढले. त्यामुळे गाडीचे वजन १०९ मेट्रीक टन झाले आणि सायंकाळी म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक मोनोरेल कलंडली आणि बंद पडली. त्यानंतर काही वेळाने वडाळा मोनोरेल स्थानकानजीक दुसरी मोनोरेल गाडीही अतिवजनामुळे बंद पडली. ही गाडी मात्र दुसऱ्या गाडीने ओढून नेत त्यातील ५६६ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

मात्र म्हैसूर काॅलनी स्थानकानजीक अडकलेली गाडी ओढून नेता येत नसल्याने अखेर अग्निशमन दलाला गाडीचा दरवाजा तोडावा लागला. त्यानंतर ५८८ प्रवाशांना बाहेर काढावे लागले. या घटनेनंतर मोनोरेलवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुखर्जी यांनी एमएमएमओसीएलमधील दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मुख्य अभियंता (सिग्नल आणि टेलिकाॅम) आणि व्यवस्थापक, सुरक्षा यांच्या चुका झाल्याचे नमूद करून या घटनेसाठी त्यांना जबाबदार धरत त्यांचे निलंबन केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

दोन उच्च पदस्थ अधिकार्यांचे निलंबन करतानाच दुसरीकडे या घटनेच्या सखोल चौकशीसाठी मुखर्जी यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयआयटी मुंबईचे प्रा. हिमांशु बहिरट, सिडकोचे मुख्य वाहतूक नियोजनकार गीता पिल्लई आणि सह महानगर आयुक्त आस्तिक पांडे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून घटना कशी घडली आणि त्याला जबाबदार कोण, कारण काय यासह अनेक बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे.