मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल मार्गिकेतील दोन मोनोरेल गाड्या अतिगर्दी, अतिवजनामुळे बंद पडल्याच्या घटनेनंतर महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (एमएमएमओसीएल) आता सर्तक झाले आहे. मोनोरेल गाडीची वजन पेलण्याची क्षमता १०४ मेट्रीक टन असल्याने इतकेच वजन घेऊन गाडी चालविण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एमएमएमओसीएलला दिले आहेत.

या आदेशानुसार गुरुवारी सकाळी गर्दीच्या वेळी मोनोरेल मार्गिकेतील आचार्य अत्रे नगर मोनोरेल स्थानकातील गाडीत मोठ्या संख्येने चढलेल्या ४० ते ४५ प्रवाशांना कर्मचारी-अधिकाऱ्यांनी खाली उतरवले. प्रवासी सुरुवातीला उतरण्यास नकार देत होते. मात्र १०४ मेट्रीक टन वजन झाल्यानंतरच गाडी पुढे जाईल, अशी ठाम भूमिका एमएमएमओसीएलने घेतल्यानंतर प्रवासी उतरले आणि गाडीचे वजन १०३ मेट्रीक टन झाले. त्यानंतर गाडी पुढे गेली. आता १०४ मेट्रीक टन वजन असेल तरच मोनोरेल पुढे जाणारच नाही हे प्रवाशांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

एमएमआरडीएच्या २० किमी लांबीच्या मोनोरेल मार्गिकेवरील म्हैसूर काॅलनी स्थानकानजीकच मंगळवारी एक गाडी अतिवजनामुळे कलंडून बंद पडली होती. यातील ५८२ प्रवाशांना अग्निशमन दलाने गाडीचा दरवाजा तोडून शिडीने बाहेर काढले. याच दिवशी वडाळा स्थानकानजीक अतिवजनामुळे दुसरी गाडीही बंद पडली होती. मात्र या गाडीला खेचून नेण्यात एमएमएमओसीएलला यश आले. या गाडीतून ५६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली होती.

या घटनेनंतर एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलच्या कारभारावर मोठी टीका होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता एमएमएमओसीएलने एमएमआरडीएच्या आदेशानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी आचार्य अत्रे नगर मोनोरेल स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होती. गाडी येताच प्रवासी गाडीत चढले आणि गाडीचे वजन थेट १०८ मेट्रीक टन झाले. गाडीतील पायलट आणि कर्मचाऱ्यांनी गाडी पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. तसेच काही प्रवाशांना गाडीतून उतरण्याची विनंती केली. मात्र प्रवासी उतरण्यास तयार नव्हते. पण गाडी पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ४० ते ४५ प्रवासी गाडीतून उतरले, गाडीचे वजन १०३ मेट्रीक टन झाले आणि मग गाडी पुढे नेण्यात आली.

एमएमएमओसीएलने आता मोनोरेल गाड्यांमध्ये अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असून या कर्मचाऱ्यांमार्फत गाडीतील गर्दीवर लक्ष ठेवले जात आहे. पायलटबरोबर आता गाडीत तांत्रिक अधिकारी तैनात करण्यात आल्याची माहिती एमएमएमओसीएलने दिली. तसेच गाड्यांमधील चार डब्यांतील ८ व्हेंटिलेशन खिडक्यांवर स्पष्ट शब्दात व्हेंटिलेशन खिडकी असे नमुद करण्यात आले आहे. मंगळवारच्या घटनेच्या वेळी गाडीत व्हेंटिलेनशन खिडकीचा उल्लेखच नसल्याने उघडकीस आले आहे.