धरणात पाणी नाही तर लघवी करायची का, असे बेताल वक्तव्य केल्याने चांगलेच अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचनाच्या निधीवाटपात स्वत:च्या पुणे जिल्ह्याला झुकते माप मिळेल अशी पुरेशी खबरदारी घेतली आहे. सिंचनाबरोबरच जिल्हा निधीच्या वाटपातही पुण्यालाच राज्यात सर्वाधिक निधी मिळाला आहे.
राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचनाकरिता विभागवार निधीचे वाटप केले जाते. राज्यपालांच्या आदेशाने विदर्भाच्या वाटय़ाला सर्वाधिक निधी मिळतो. विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्य़ांच्या पाठोपाठ निधी पुणे जिल्ह्य़ाच्या वाटय़ाला आला आहे. कृष्णा खोऱ्याच्या वाटय़ाला १४०० कोटी रुपये आले असून, यापैकी ४३५ कोटी रुपये अजितदादांच्या पुणे जिल्ह्य़ाला मिळणार आहेत. यंदा ५२०० कोटी रुपयांच्या जिल्हा विकास योजनेत राज्यात सर्वाधिक ३२४ कोटी रुपये पुणे जिल्ह्य़ाला मिळाले आहेत. निधीचे वाटप करण्याकरिता निकष ठरलेले असले तरी गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्ह्य़ाच्या निधीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली दिसते. पुणे जिल्ह्य़ाला जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे यावर अजितदादांचा कटाक्ष असतो, असे वित्तअधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केवळ राज्यपालांच्या आदेशामुळे विदर्भातील २ जिल्ह्य़ांना पुण्यापेक्षा जास्त निधी मिळाला आहे.
विभागवार निधी
*    मराठवाडा – १६४३ कोटी
*    विदर्भ – २८१२ कोटी
*    तापी खोरे – ६०३ कोटी
*    कोकण – ६८४ कोटी
* कृष्णा खोरे – १४०० कोटी (उस्मानाबाद आणि बीड १०० कोटी अतिरिक्त)