मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी नागपूर ते मुंबई या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरिता आतापर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास भूसंपादन झाले असून, सर्वाधिक भूसंपादन बुलढाणा जिल्ह्य़ात झाले आहे.

समृद्धी महामार्गाकरिता ७४५० हेक्टर्स आर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. समृद्धी महामार्गाकरिता भूसंपादनास मोठय़ा प्रमाणावर विरोध झाला आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने आधी विरोध केला होता. पण भूसंपादनाचे शिवसेनेकडील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत असल्याने शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. सक्तीने भूसंपादन केले जाणार नाही, असे या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे हे सांगतात, पण त्याच वेळी भूसंपादनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करतात. शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आधी समृद्धीला विरोध केला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादमध्ये समृद्धी विरोधात परिषदही आयोजित केली होती. पण कालांतराने राष्ट्रवादीचा विरोध कमी होत गेल्याचे बोलले जाते.

आतापर्यंत ६२२६ एकूण जमीन खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्या अंतर्गत सरकारजवळ ३७३२ हेक्टर्स आर जमीन ताब्यात आली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे – बुलढाणा – ५९० हेक्टर्स. एकूण संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रापैकी ५१ टक्के. औरंगाबाद – ५५५. ९ हेक्टर्स (४४ टक्के), नाशिक – ४८३ हेक्टर्स (४३.८२ टक्के), वाशिम – ५६४ हेक्टर्स (५४.०९ टक्के), अमरावती – ४२८ हेक्टर्स (५१ टक्के), वर्धा – ४०७ हेक्टर्स (६७.४५ टक्के), जालना – २०७ हेक्टर्स (४७.८३ टक्के), ठाणे – २०५ हेक्टर्स (४० टक्के), नागपूर – १६१ हेक्टर्स (७९ टक्के), नगर – १२८ हेक्टर्स (४१ टक्के).

भूसंपादनासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. समृद्धीकरिता भूसंपादन करायचे असलेल्या दहाही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने शेतकरीवर्गाशी चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्य़ांमध्ये खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.