नमिता धुरी

ज्या काळात भारतीय स्त्रियांनी घराच्या उंबरठय़ाबाहेर पाऊल ठेवणेही कठीण होते, अशा काळात काही समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाचा विडा उचलला. त्यातील एक नाव म्हणजे अवंतिकाबाई गोखले. चूल आणि मूल या भारतीय परंपरेत जखडून गेलेल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अवंतिकाबाईंनी १९१८ साली ऑपेरा हाऊस येथील आपल्या राहत्या घरी हिंद महिला समाजाची स्थापना केली.  येत्या २८ नोव्हेंबरला या संस्थेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता स्वत:ला वाहून घेतलेल्या अवंतिकाबाईं गोखले यांचे लग्न वयाच्या नवव्या वर्षी झाले. त्या काळच्या इतर मुलींप्रमाणेच त्याही अशिक्षित होत्या. मात्र शिक्षणासाठी विलायतेला जाताना त्यांच्या पतीने त्यांना ताकीद दिली की, ‘‘मी विलायतेहून परत येईपर्यंत तुला लिहिता-वाचता आले नाही, तर तुला नांदवणार नाही.’ त्यामुळे अवंतिकाबाईंकडे शिकण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. त्या सासऱ्यांकडून इंग्रजी शिकल्या. पुढे जाऊन परिचारिकेचे शिक्षण घेतले. डॉक्टरांना मदत करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यावर त्यांना जाणवले की, अशिक्षितपणामुळे भारतीय स्त्रिया गुलामीचे आयुष्य जगत आहेत. त्यांना शिकवावे, स्वावलंबी बनवावे या हेतूने त्यांनी हिंद महिला समाजाच्या माध्यमातून काम सुरू केले. त्याआधी १९१६ साली त्या महात्मा गांधींना भेटल्या होत्या. त्यांच्यासोबत चंपारण्य सत्याग्रहात सहभागी झाल्या होत्या. खरे तर त्याचवेळी त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. बिहारमध्ये फिरून तिथल्या स्त्रियांना आरोग्य आणि शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. १९१९ साली इचलकरंजीच्या राणीसोबत इंग्लंडला जाण्याची संधी बाईंना मिळाली. तिथल्या श्रीमंत घरातल्या स्त्रियांना काम करताना त्यांनी पाहिले आणि भारतात परतल्यावर नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली. स्वत ब्राह्मण कुटुंबातल्या असूनही अस्पृश्य समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली.

गिरणी कामगारांच्या पत्नींना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी हिंदू महिला समाजातर्फे कस्तुरबा गांधी वाचनालय सुरू करण्यात आले. परंतु याला फारच कमी प्रतिसाद मिळाला. अवंतिकाबाई आणि त्यांच्या सहकारी महिला पिशवीत पुस्तके घेऊन दारोदार फिरत. घरातल्या स्त्रियांना वाचनाचा आग्रह धरत. हळूहळू स्त्रियांना वाचनालयाकडे वळवण्यात संस्थेला यश आले. आधुनिक समाजात वावरणे स्त्रियांना सोपे व्हावे यासाठी संस्थेतर्फे हिंदी आणि इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले. एव्हाना स्त्रिया शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन शिकू लागल्या होत्या. त्यामुळे या वर्गाचा प्रतिसाद हळूहळू कमी होत गेला आणि वर्ग बंद झाले. शिवणवर्ग, पाकशास्त्राचे वर्ग, प्रथमोपचाराचे वर्ग, वधू-वर सूचक मंडळ असे उपक्रमही राबवण्यात आले. स्त्रियांना स्वावलंबी बनवायचे तर त्यांच्या हाताला काम दिले पाहिजे. मग हिंद महिला समाजातर्फे उद्योग मंदिर सुरू करण्यात आले. यामध्ये महिला दिवाळीचा फराळ, पुरणपोळ्या स्वत तयार करून १२ महिने विकतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांपुढे सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, ‘मुलांना कोण सांभाळणार? ‘हिंद महिला समाजा’ने महिलांचा हाही प्रश्न सोडवला. अशा स्त्रियांच्या मुलांसाठी पाळणाघर चालवले जाते.

ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या सबलीकरणासाठी अनेक संस्था काम करतात. मात्र मुंबईसारख्या विकसित, पुढारलेल्या, सुशिक्षित शहारातील स्त्रियांच्याही स्त्री म्हणून काही समस्या आहेत, त्यांच्यासाठी कोणीतरी काम करण्याची गरज आहे हे हिंदू महिला समाजाच्या कार्यावरून दिसून येते. संस्थेच्या संस्थापिका अवंतिकाबाई यांनी महात्मा गांधींचे चरित्र मराठीतून समाजासमोर आणले. गांधींसोबत स्वातंत्र्यासाठी लढत असताना

त्यांनी तुरुंगवासही भोगला. राजकीय नेता म्हणून धडाडीने काम केले. लोकमान्य टिळकांनी त्यांना महाराष्ट्राची सरोजिनी नायडू म्हणून गौरविले होते. २६ मार्च १९४९ रोजी अवंतिकाबाईंचे कर्करोगाने निधन झाले. मात्र त्यांनी स्थापन केलेल्या हिंदू महिला समाजाचे कार्य आजही त्याच उत्साहाने सुरू आहे.