गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपली सडेतोड आणि आक्रमक भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी थेट राज्य सरकारला आव्हान दिलं आहे. “येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही”, असं थेट आव्हानच संभाजीराजे भोसले यांनी दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा केला असून प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यामध्ये आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्यामुळे लोकं शांत आहेत”

मराठा समाज अस्वस्थ असल्याचं संभाजीराजे यावेळी म्हणाले. “मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. त्या दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जर ६ जूनपर्यंत यावर काही कारवाई केली नाही. तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? त्यामुळे ६ जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर नंतर आम्ही कोविड-बिविड बघणार नाही. मी स्वत: ५ मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती शांत बसायचं?” असं ते म्हणाले.

…पण आंदोलनात लोकं नसणार!

दरम्यान, यावेळी बोलताना या आंदोलनात लोकांना वेठीला धरलं जाणार नाही, असं त्यांनी नमूद केलं आहे. “मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय, या गोष्टी तुम्ही मार्गी लावा. नाहीतर मी कोविड वगैरे काहीही बघणार नाही. हा संभाजीराजे आघाडीवर असणार तिथे. समाजाला आम्हाला वेठीला धरायचं नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचं नाहीये. ६ तारखेला लोकांना नाही तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार. आता लोकांची ही जबाबदारी नाही, तर या सगळ्या खासदार, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद इथल्या सर्वांनी यायला हवं”, असं ते म्हणाले.

“आम्हालाही आक्रमक होता येतं, किती वर्ष या वर्गाचा वापर करून घेणार?”, मराठा आरक्षणावरून संभाजीराजे कडाडले!

दिल्लीत मराठा समाजाची गोलमेज परिषद

राजधानी दिल्लीमध्ये मराठा समाजाची पहिली गोलमेज परिषगद होणार, अशी घोषणा यावेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली. “दिल्लीला मराठा समाजाची गोलमेज परिषद होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व आमदार-खासदारांना, मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्षनेत्यांना मी स्वत: आमंत्रण देणार आहे. ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये. मराठा समाजाला तुच्छ लेखू नका. आता वेळी आलीये कृती करण्याची”, असं ते म्हणाले. तसेच, “त्यासोबत किमान दोन दिवसांचं मराठा समाजावर अधिवेशन व्हायला हवं. अधिवेशनात आरोप-प्रत्यारोप करायचे नसून समाजाच्या भल्यासाठी काम करा. आम्ही वर गॅलरीत बसून त्यावर लक्ष ठेऊ. नाहीतर सांगून टाका की या माराठा समाजाचं आम्हाला मतदानच नको आहे. धाडस असेल तर सांगून बघा असं. मग बघतो आम्ही काय करायचं ते”, असं देखील आव्हान संभाजीराजे भोसले यांनी दिलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp sambhaji raje bhosale challenge maharashtra government on maratha reservation pmw
First published on: 28-05-2021 at 17:57 IST