मुंबई : सध्या जे काही राजकारणात चालेले आहे, ते पाहून अस्वस्थ करणारा काळ आहे, असे वाटते. ईडीचा धाक, दडपशाहीने ज्यांनी सत्ता ओरबाडून घेतली त्यांनी गेल्या अडीच महिन्यांत सामान्य जनतेला दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी मुंबईतील काही गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी देशात सध्या ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे, ते अस्वस्थ करणारे आहे, असे मत व्यक्त केले.
सरकारविरोधात जाणाऱ्यांवर छापे पडत आहेत, हे आता काही नवीन राहिले नाही. इतर पक्षांतून जे लोक भाजपमध्ये जातात त्यांच्या चौकशा थांबतात, असे भाजपचेच लोक सांगत आहेत. महाराष्ट्रात ईडीचा धाक दाखवून, दडपशाही करून सत्ता ओरबाडून घेतली. परंतु गेल्या अडीच महिन्यांत सर्वसमान्य जनतेला दिलासा मिळेल, असा एकही निर्णय या सरकारने घेतलेला नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले.
बारामतीवरून भाजपला टोला..
बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा सुप्रिया सुळे यांनी उपरोधिक भाषेत समाचार घेतला. संविधानाने प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढविण्याचा अधिकार दिला आहे, त्यानुसार बारामतीमध्ये कुणी आले तर त्यात गैर काही आहे, असे मला वाटत नाही. लोकांना आयआटी, आयआयएममध्येच प्रवेश हवा असतो, कारण देशातील त्या सर्वात चांगल्या संस्था आहेत. तसेच प्रत्येकाला चांगलेच हवे असते. बारामती मतदारसंघ तेथील जनतेने कष्ट करून विकसित केला आहे. त्याकडे कुणाचे लक्ष गेले असेल, तर त्यात काही चुकीचे नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल ज्यांनी प्रेम दाखविले, त्यांचे मनापासून स्वागत असा टोला त्यांनी भाजपला हाणला.