२५ टक्केच स्थानिक

एसटी महामंडळात कोकणपट्टय़ासाठी स्थानिक चालक न मिळण्याची समस्या  गंभीर बनत चालली असून, यंदाही या विभागासाठी भरती प्रक्रियेत  केवळ २५ टक्केच स्थानिक चालक मिळाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे सुरू असलेली ही समस्या नेमकी कशी सोडवायची, हा यक्षप्रश्न एसटी महामंडळासमोर आहे.

एसटीत मुंबई विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश होता. या सर्व कोकणपट्टय़ात स्थानिक चालकांची भरती संख्या कमी  आहे. त्यामुळे मुंबई आणि पर्यायाने कोकणातील एसटीचालकांच्या भरतीसाठी इतर विभागांतून अर्ज केले जातात. जागांच्या उपलब्धतेमुळे त्यांची निवड केली जाते. त्यामुळे कोकणात भरती होणारे चालक प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. हीच बाब लक्षात घेऊन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही एसटीच्या भरतीत कोकणासाठी विशेष पॅकेज देणार असल्याची घोषणा केली होती. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. त्यादृष्टीने यवतमाळ आणि गडचिरोली येथे विशेष प्रशिक्षण केंद्रांप्रमाणे कोकणातही अशी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याचे करता येईल, असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले.

मात्र कमी वेतन या समस्येच्या मुळाशी असल्याचे बोलले जात आहे. एसटीमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी कनिष्ठ श्रेणीत भरती होणाऱ्या चालकाला सात हजार रुपये वेतन आहे. तर रोजगार-व्यवसाय-शिक्षणाचे विविध आणि चांगले वेतन असलेले पर्याय उपलब्ध असल्याने या नोकरीसाठी उत्सुक नसते.