एसटीकडून लग्नसमारंभासाठी वातानुकूलित बस
लग्न समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीचा प्रवास आता एसटीतील वातानुकूलित बसमधूनही होऊ शकतो. एसटी महामंडळाने लग्नसमारंभासाठी वातानुकूलित शिवशाही बस ५४ रुपये प्रति किलोमीटर इतक्या माफक दरात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपरत्रकच एसटी महामंडळाकडून काढण्यात आले आहे.
एसटी महामंडळाकडून दोन हजार वातानुकूलित शिवशाही बस टप्प्याटप्प्यात दाखल केल्या जात आहेत. सध्या १०० पेक्षा जास्त बस सेवेत आहेत. बस दाखल झाल्यानंतर त्याला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे महामंडळाने शिवशाही बससाठी नुकताच ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेअंतर्गत पास देण्याचा निर्णही घेतला. या योजनेतंर्गत सात दिवस आणि चार दिवस पासांसाठी मूल्य आकारले जाते. यानंतर महामंडळाने लग्नसमारंभासाठी माफक दरांत वातानुकूलित बस देण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक यात्रा, सहल आणि इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या लोकांसाठी वातानुकूलित बस
प्रवाशांना उपलब्ध होईल. सध्या ज्या आगारांकडे या बस उपलब्ध आहेत. त्या आगारांत याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
५४ रुपये प्रति किलोमीटर दर
एसटीकडून साध्या बस दिल्या जात असतानाच वातानुकूलित बसही लग्नसमारंभासाठी देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात होती. साध्या बसकडे प्रवासी पाठ फिरवत असल्याने अखेर प्रवाशांची मागणी लक्षात घेता प्रासंगिक करारावर वातानुकूलित बस देण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. ८ डिसेंबपरपासून शिवशाही वातानुकूलित ४५ आसनी बस ५४ रुपये प्रति किलोमीटर दराने प्रासंगिक करारावर उपलब्ध करण्यात आली आहे. दिवसाला किमान ३५० किलोमीटरचे भाडे भरून प्रासंगिक करार पद्धतीनुसार बस भाडय़ाने घेता येणार आहे.