मुंबई : दहीहंडीचा सराव सुरू असताना सहाव्या थरावरून कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव महेश जाधव असून दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा मुलगा नवतरुण मित्र मंडळ पथकातील सदस्य होता. याप्रकरणी सोमवारी दहिसर पोलीस ठाण्यात मंडळाच्या अध्यक्षाविरोधात निष्काळजीपणे कृती करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसरच्या केतकीपाडा येथील हनुमान नगरमध्ये नवतरूण मित्रमंडळ आहे. या मंडळाचे दहीहंडी पथक असून ते विविध ठिकाणीदहीहंडी उत्सवात भाग घेत असते. यंदा मंडळाचे पथक दहीहंडी उत्सावाची तयारी करीत होते. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सराव सुरू होता. या पथकात महेश रमेश जाधव (११) या बालगोविंदाचा समावेश होता. रविवारी रात्री पथकाने सराव करताना एकूण सहा थर रचले होते. महेश सर्वात लहान असल्याने सहाव्या थरावर चढला होता. रात्री ९.४५ च्या सुमारास तो सहाव्या थरावरून खाली कोसळला. त्याला झेलण्यासाठी कुणी नसल्याने तो जमिनीवर पडला. त्याला दहिसरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा

महेश दहिसर (पूर्व) येथील धारखडी येथे वास्तव्यास होता. त्याची आई घरकाम, तर वडील मजुरी करतात. त्याला तीन लहान भावंडे आहे. सर्वात लहान भाऊ एक वर्षाचा आहे. महेश सर्वात मोठा होता. या दुर्घटनेमुळे केतकीपाडा परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

मंडळाच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणात सुरवातीला दहिसर पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. नंतर महेशची आई संगिता जाधव (३०) यांनी याबाबत मंडळाने सुऱक्षेची कुठलीही साधने पुरवली नसल्याची तक्रार दिली. त्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी नवतरूण मित्रमंडळाचा अध्यक्ष बाबू सुरनार याच्याविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, तसेच सरकारी सेवकाच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नेमका महेश कसा खाली पडला त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

सुरक्षा साधनांचा अभाव

नियमानुसार दहीहंडी पथकातील गोविंदांना हेल्मेट, पट्टा आदी सुरक्षेची साधने पुरविणे आवश्यक आहे. पडलेल्या गोविंदाना दुखापत होऊ नये यासाठी जमिनीवर जाड गादी अंथरणे आवश्यक आहे. मात्र या मंडळाने अशा प्रकारच्या कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या, असे पोलिसांनी सांगितले.