मुंबई : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांची कामे वेगात सुरू असून या प्रकल्पातील पूल, स्थानक व इतर पायाभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत. उत्तर प्रदेशातील कारखान्यात बनवलेला स्टीलचा पूल नुकताच गुजरातमधील बुलेट ट्रेनच्या मार्गावर यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे.

दिल्ली, मुंबई आणि चेन्नईला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ४८ हा सहा मार्गिकांचा सर्वात व्यस्त महामार्ग आहे. गुजरातमधील नडियाद जवळील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये राष्ट्रीय महामार्ग ४८ ओलांडण्यासाठी दोन १०० मीटर लांबीच्या स्टील स्पॅन उभारण्यात आले आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर हा स्टील पूल उभारण्यात आला आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात स्टीलच्या पुलाची उभारणी करण्यात येत असून देशातील स्टील उद्योगाला लक्षणीय चालना मिळत असल्याचे मत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या महामार्गावर वाहतुकीला अडथळा न आणता वेळापत्रकानुसार स्पॅनची उभारणी करण्यात आली.

या स्टील पुलाचा १०० मीटरचा स्पॅन सुमारे १४.६ मीटर उंचीचा आणि १४.३ मीटर रुंदीचा आहे. त्याचे वजन सुमारे १,४१४ मेट्रिक टन आहे. उत्तर प्रदेशातील हापूरजवळील सालासर येथील कारखान्यात हा स्टील पूल बनवण्यात आला आहे. तसेच या पुलाचे आयुर्मान १०० वर्षे असेल अशा प्रकारची रचना आणि अत्याधुनिक साहित्य वापरण्यात आले आहे.

बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गात २८ स्टील पूल उभे करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी १७ स्टील पूल गुजरातमध्ये आणि ११ स्टील पूल महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत वडोदरा, सुरत, आणंद आणि दादरा नगर हवेली येथील सिल्वासा येथे सात स्टील पूल उभे केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेड ( एनएचएसआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता यांनी नुकताच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पाहणी दौरा केला. यावेळी संचालक, कंत्राटदार, सल्लागार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकसोबत होते.

  • मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग ५०८ किमीचा प्रकल्प असून या प्रकल्पाची ११ टप्प्यात विभागणी केली आहे.
  • महाराष्ट्रात शीळफाटा ते गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत १३५ किमींचे काम करण्यात येत आहे.
  • ठाणे, विरार, बोईसर या तीन स्थानकांची पायाभरणीचे कामे सुरू आहेत.
  • ४६५ किमी लांबीचे व्हायाडक्ट (लांबलचक पूल), १२ स्थानके, १० किमीचे २८ स्टील पूल, २४ नदी पूल, ९७ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाईल.