मुंबई विमानतळावर शनिवारी थर्ड पार्टीडेटा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने विमानांच्या उड्डाणे प्रभावित झाल्याची घटना घडली. यानंतर एअर इंडियाने प्रवाशांना संभाव्य उशीराबाबत माहिती देत एक अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. दरम्यान या बिघाडामुळे एअर इंडियासह इतरही अनेक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान विमान कंपनीने माहिती दिली की, बिघाड झालेली सिस्टीम दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र असे असले तरी काही विमानांच्या उड्डाणांना उशीर होण्याची शक्यता आहे, आणि ही उड्डाणे काही काळांनी सुरळित होतील. तसेच विमान कंपनीने विमानतळाकडे जाण्याच्या आधी फ्लाइटचे स्टेटस तपासून घेण्याचा सल्ला प्रवाशांना दिला आहे.

एअर इंडियाने काय म्हटलंय?

“मुंबई विमानतळावर थर्ड-पार्टी डेटा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्यामुळे चेक-इन सिस्टमवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांच्या उड्डाणांना उशिर झाला. त्यानंतर सिस्टीम पुर्ववत करण्यात आली आहे, मात्र परिस्थिती हळूहळू सामान्य होत असल्याने आमच्या काही उड्डाणांवर अजून काही काळासाठी परिणाम जाणवू शकतो,” असे एअर इंडियाने एक्सवर पोस्ट करत सांगितले आहे.

रक्षाबंधन सण शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून आल्याने लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत, यादरम्यान हा बिघाड झाल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला.

दिल्लीत पावसाचा धुमाकूळ

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्री विमानतळावर आज मुसळधार पावसामुळे ३०० हून अधिक विमानांना उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच काही विमान उड्डाणे रद्द झाल्याची देखील वृत्त आहे.