मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बसवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. काम करूनही उचित दाम मिळत नसल्याने, कर्मचारी वर्ग हवालदिल झाला आहे. ‘समान कामासाठी समान वेतन’ मिळविण्याच्या मागणीसाठी संघर्ष कामगार कर्मचारी युनियन संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, याबाबत बेस्ट उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने मतदान घेण्यात येत आहे. नुकताच बेस्टच्या पाच आगारांमधील १,५२६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. तर, २२ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
बेस्ट उपक्रमातील डागा ग्रुप, मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्यूशन्स, बी.व्ही.जी. इंडिया व इतर खासगी कंपन्यांमार्फत बेस्टच्या एकूण ताफ्यापैकी ८३ टक्के बसचे व्यवस्थापन केले जाते. परंतु, या खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि बेस्टमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन भिन्न आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात बस सेवा देण्यासाठी कायम सेवेत असलेल्या कामगारांचे आणि खासगी कंपन्याद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे काम सारखेच आहे. त्यामुळे त्याचे वेतन देखील सारखेच असले पाहिजे. बेस्ट उपक्रमामधील कायम आणि नियमित कामगारांना लागू असलेले वेतन व इतर सेवाशर्ती कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने लागू कराव्या, अशी मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनतर्फे करण्यात आली आहे.
कोणत्या पाच आगारात मतदान पार पडले
बेस्ट उपक्रमातील देवनार, शिवाजी नगर, घाटकोपर, मुलुंड, मुंबई सेंट्रल या आगारांत मतदान पार पडले. देवनार आगारातील २०६, शिवाजीनगर आगारातील २९६, घाटकोपर आगारातील २५८, मुलुंड आगारातील ४६१, मुंबई सेंट्रल आगारातील ३१४ कर्मचाऱ्यांनी मतदान केले.
गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष सुरू
गेल्या दोन वर्षांपासून बेस्ट उपक्रम, महापालिका आयुक्त, संबंधित सेवा पुरवणाऱ्या संस्थांना संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने पत्र पाठवले आहे. मात्र, अद्याप कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता संप करण्याचा विचार सुरू आहे. यासाठी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेऊन, पुढील रणनीती ठरवली जाईल, असे मत संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी व्यक्त केले.
संप झाल्यास प्रवाशांचे हाल
बेस्ट उपक्रम आणि खासगी कंत्राटदारांनी समान कामाला, समान वेतन देण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तसेच कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने मतदान केले आणि कोणताही तोडगा निघाला नाही. तर, मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सेवेवर मोठा परिणाम होईल. त्यामुळे बेस्टवर दररोज अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.