मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंगळवारी दिवसभरात मुंबईत सरासरी २०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याचे सांगितले. शहरातील २३ ठिकाणी पावसाने २०० मिमीची पातळी ओलांडली. त्यामुळे शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. वरळी, माटुंगा, कुर्ला आणि भांडुप परिसरात सर्वाधिक पाणी साचले होते, अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली. तसेच त्यांनी मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काल अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईपलाईन्समध्ये दुषित पाणी गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांनी पाणी उकळवून प्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच साथीच्या रोगांपासून सावध राहण्याचाही सूचना त्यांनी दिल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच काल दिवसभरात मुसळधार पावसामुळे शहरातील २४७ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच अनेक ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी तुंबले होते. या पार्श्वभूमीवर काल पालिकेचे ३० हजार कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. मुसळधार पावसामुळे साठलेल्या या पाण्याचा निचरा करण्यासाठी लावण्यात आलेल्या ३१३ पंपांपैकी २२९ पंप काल पूर्ण क्षमतेने कार्यरत होते. याबरोबरच सिव्हरेज लाइनचे पाणी बाहेर काढण्यासाठी पालिकेकडे असलेल्या ११० पंपांचा उपयोग काल पाणी उपसण्यासाठी करण्यात आला. या पंपांद्वारे मंगळवारी तब्बल ३ हजार ७५६ दशलक्ष मीटर पाणी बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अजॉय मेहता यांनी दिली. मात्र एवढी मोठी यंत्रणा कामाला लागल्यानंतर देखील पाण्यात मिसळलेले प्लास्टिक आणि थर्माकोल अशामुळे पाण्याचा निचरा होण्यास मोठा विलंब लागला. सध्या मुंबईतील पाऊस थांबला असून आता रस्त्यावर आलेला कचरा हटवण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पालिकेने २८ हजार कर्मचारी तैनात केले आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार मेट्रिक टन कचरा हटवण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

दरम्यान, काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिक लोकल गाड्यांमध्ये अडकून पडले होते. यापैकी ४२५ नागरिकांना अग्निशामन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. तर पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. त्यामुळे १५ ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलावे लागले, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai bmc commissioner ajoy mehta briefing about heavy rain in mumbai
First published on: 30-08-2017 at 15:42 IST