मुंबई : पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहेत. मुंबई महापालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी मोबाइल ॲप तयार केले असून महिन्याभरात ॲपवर खड्ड्यांच्या साडेतीन हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. खड्ड्यांसंदर्भात अंधेरी (पश्चिम) आणि भांडूप परिसरातून सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबई रस्त्यावर खड्डे पडतात. मुंबईत पावसाळ्यात होणारी अतिवृष्टी आणि वाहनांची वर्दळ यामुळे डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्ड्यांवरून मुंबई महापालिकेवर मोठ्या प्रमाणावर टीका होते. उच्च न्यायालयानेही अनेकदा मुंबई महापालिकेला यावरून फटकारले असून खड्ड्यांच्या तक्रारींसाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार यंदा मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची माहिती देण्यासाठी एक डॅशबोर्डही तयार करण्यात आला आहे. रोज किती खड्ड्यांच्या तक्रारी आल्या, किती खड्डे बुजवले याची माहिती या डॅशबोर्डवर दिली जाते.
१९२ खड्डे शिल्लक
‘पॉटहोल क्विकफिक्स’ मोबाइल ॲप ९ जूनपासून कार्यान्वित झाले असून या ॲपवर १९ जुलैपर्यंत ३५१७ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३३२५ तक्रारींमधील खड्डे बुजवण्यात आले आहेत. तर १९२ खड्डे अद्याप बुजवण्याचे बाकी आहेत. दरम्यान, या ॲपवर अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्याही तक्रारी येत आहेत. मुंबईत म्हाडा, बीपीटी, एमएसआरडीसी अशा अन्य प्राधिकरणांचेही रस्ते आहेत. अन्य प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या २५८ तक्रारी आहेत. तर तब्बल ९५५ तक्रारी या खड्ड्यांव्यतिरिक्त अन्य समस्येबाबत करण्यात आल्या आहेत.
अंधेरी, भांडूपमधून जास्त तक्रारी
खड्ड्यांच्या तक्रारींमध्ये अंधेरी पश्चिम व भांडूप परिसरातून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. भांडूप परिसरातून सर्वाधिक ४५३ तक्रारी, तर त्या खालोखाल अंधेरी पश्चिम परिसरातून ३८६ तक्रारी करण्यात आल्या आहेत. मालाडमधून ३०१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर मशीद बंदर, सॅण्डहर्स्ट रोडचा भाग असलेल्या बी विभागात सर्वात कमी २१ तक्रारी नोंदवल्या आहेत. उपनगरातील विभाग हे क्षेत्रफळाने मोठे असून या ठिकाणी रस्त्यांची संख्याही मोठी आहे. उपनगरातील रस्त्यांचे अद्याप कॉंक्रीटीकरण पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या ठिकाणी खड्ड्यांची संख्या जास्त असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली.
तक्रार करण्यासाठी चार पर्याय
मुंबई महानगरपालिकेने खड्ड्यांच्या तक्रारींसाठी यंदा नागरिकांसाठी चार पर्याय ठेवले आहेत. त्यात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचा मदत क्रमांक १९१६ वरही तक्रार नोंदवता येणार आहे. तसेच समाजमाध्यमांवरील पालिकेच्या एक्स अकाऊंटवर, मोबाइल ॲपवर आणि व्हॉट्स ॲप चॅटबॉट वरही तक्रार नोंदवता येणार आहे. व्हॉट्स ॲप चॅटबॉट (क्रमांक: ८९९९२२८९९९) सेवाही सुरू करण्यात आली आहे. याद्वारे देखील खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. ‘Pothole’ किंवा ‘PT’ (इंग्रजीत), तसेच ‘खड्डा’ किंवा ‘ख’ (मराठीत) असे प्रमुख शब्द (Key Word) वापरून, नागरिक व्हॉट्स ॲप चॅटच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. दरवर्षी २२७ प्रभागातील अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक देण्यात येत होते. मात्र यंदा त्याऐवजी पॉटहोल क्विकफिक्स या ॲपवरून २२७ प्रभागांमधून तक्रारी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
४८ तासात खड्डा बुजवणार
नागरिकांनी मोबाइल ॲपवर केलेल्या तक्रारीतील खड्डा ४८ तासांत बुजवणे अपेक्षित आहे. खड्डा ४८ तासां बुजवला नाही तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच ती तक्रार वरिष्ठ पातळीवर पोहोचणार आहे. तसेच एखादा खड्डा बुजवल्यानंतर नागरिकांचे समाधान झाले नाही, तर त्यांना त्याच खड्ड्याची पुन्हा एकदा तक्रार करता येणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.