लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या अभिन्यासाचे ड्रोनने सर्वेक्षण करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. आतापर्यंत अभिन्यासात काय बदल झाले आहेत, अतिक्रमणे वाढली आहेत का यासह अन्य काही बाबींची माहिती या ड्रोन सर्वेक्षणाअंतर्गत घेण्यात येणार आहे. यासाठी मंडळाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गोरेगाव पश्चिम येथील १४३ एकर जागेत मोतीलाल नगर वसाहत उभी आहे.मोतीलाल नगल १, २ आणि ३ या नावाने असलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी’अंतर्गत (सी अँड डी) केला जाणार आहे. मात्र मोतीलाल नगर पुनर्विकासाचा वाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मोतीलाल नगरचा पुनर्विकास अद्यापही मार्गी लागलेला नाही. मुंबई मंडळाने या पुनर्विकास प्रकल्पासाठी बांधकाम निविदा काढली असून तांत्रिक निविदा खुली केली आहे. यात अदानी समुह आणि एल अँड टी समुहाची निविदा पात्र ठरली आहे. मात्र पुनर्विकासाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरच आर्थिक निविदा खुल्या करून पुनर्विकासाचे कंत्राट दिले जाणार आहे. असे असताना आता मंडळाने मोतीलाल नगरचा ड्रोनने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. १० मे रोजी ड्रोन सर्वेक्षणासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार मोतीलाल नगर १,२ आणि ३ च्या अभिन्यासाचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

आणखी वाचा-परदेशी वैद्यकीय पदवीधरांना आंतरवासिता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रहिवाशांचा विरोध

निविदा सादर करण्याची अंतिम तारीख गुरुवारी असून त्याच दिवशी सायंकाळी निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुढील कार्यवाही करून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येईल. दरम्यान या ड्रोन सर्वेक्षणाला मोतीलाल नगरमधील रहिवाशांनी विरोध केला आहे. पुनर्विकासाच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध केलेली असताना, तांत्रिक निविदा खुल्या केल्या असताना आणि पुनर्विकासाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ड्रोन सर्वेक्षणाची गरजच काय असा प्रश्न मोतीलाल नगर विकास समितीचे पदाधिकारी निलेश प्रभू यांनी उपस्थित केला आहे.