मुंबई- शेजाऱ्यांच्या पाळीव मांजरीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून फेकून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. बोरिवलीच्या बाभई परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी इमारतीत राहणार्या ७९ वर्षाच्या वृध्देविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून हा प्रकार उघडकीस आला होता.

बोरिवलीच्या पश्चिमेकडील बाभई परिसरातील कृष्णा क्लासिक नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये म्हात्रे कुटुंबीय राहतात. त्यांनी चॉकलेट नावाचे एक मांजर पाळले होते. रविवारी त्यांच्या घरात साफसफाईचे काम सुरू होते. त्यांनी काही वेळ मांजरीला घराबाहेर ठेवले होते. काही वेळाने त्या मांजरीला आणायला बाहेर गेल्या. मात्र त्यांना मांजर दिसले नाही.

वरून पडून मांजरीचा मृत्यू

मांजरीचा शोध सुरू असताना ती मांजर इमारतीखाली पंपाच्या शेजारी मृतावस्थेत दिसली. अचानक मांजर कशी काय मरण पावली हे समजत नव्हते. मग म्हात्रे कुटुंबियांनी इमारतीचे सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले. त्यात इमारतीत राहणारे विलास पाठारे (७९) हे मारहाण करून काठीने मांजरीला पाचव्या मजल्यावरून ढकलताना दिसले. त्यामुळे मांजर पळत असताना खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

वृध्दाविरोधात गुन्हा

याप्रकरणी म्हात्रे यांच्या तक्रारीवरून विलास पाठारे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या कलमाअंतर्गत बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वृध्द असल्याने त्यांच्या घरी जाऊन पुढील कारवाई केली जाईल, असे बोरिवली पोलिसांनी सांगितले.