कफ परेड परिसरात टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दोन जवानांसह तिघांना पोलिसांनी अटक केली. गंभीर बाब म्हणजे या टॅक्सीचालकाला वाचविणाऱ्या दोन पोलिसांनाही आरोपींनी मारहाण केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एकाचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कफ परेड येथील बधवार पार परिरात टॅक्सीचालक चुन्नीलाल वाल्मिकी (६१) याला काही व्यक्ती मारत असल्याची माहिती कफ परेड पोलिसांना मिळाली. बधवार पार्क पोलीस चौकीत तैनात पोलीस अविनाश वाघमारे व पोलीस हवालदार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी प्रवीणकुमार अशोक सिंह(२७), चंद्रभान प्रताप सिंह (२६) व अभिजीतकुमार अजयबहादूर सिंह (३०) हे चुन्नीलालला मारहाण करीत होते. पोलिसांनी या तिघांच्या तावडीतून चुन्नीलालची सुटका केली. त्यावेळी या तिघांनी पोलिसांनाही मारहाण करून धमकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणानंतर अविनाश वाघमारे यांच्या तक्रारीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहेत. याप्रकरणी प्रवीणकुमार, चंद्रभान व अभिजीत कुमार यांना कफ परेड पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण कुमार व चंद्रभान हे दोघे सीआयएसएफमध्ये, तर अभिजीतकुमार भारतीय नौदलात कार्यरत आहे. त्याचबरोबर याप्रकरणी आर. एस. दुबे याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मालाड आयएनएस हमला येथील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.