गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणारा मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या एका लेनचं उद्घाटन करण्यात आलं. हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तिसऱ्यांदा साधला मुहूर्त?

मुंबई सागरी किनाऱ्याचं उद्घाटन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, तेव्हा ते होऊ शकलं नाही. १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्याचं उद्घाटन केलं जाईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, त्याही वेळी हा मुहूर्त चुकला. २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमध्ये मोदी एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं जाईल, अशीही चर्चा पाहायला मिळाली. मात्र, तेव्हाही हे उद्घाटन होऊ शकलं नाही. अखेर आज या सागरी मार्गाच्या एका लेनचं उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

कोणता टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला?

मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतच्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या टप्प्यावरील एका लेनचं उद्घाटन करण्यात आलं आहे. सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे.

विश्लेषण: देशातील सर्वात लांब सागरी सेतू कसा आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत सागरी सेतूंमार्फत वाहतूक समस्येवर तोडगा?

मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सागरी सेतूंची मोठी मदत होणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यामध्ये नरीमन पॉइंट ते वर्सोवा हा पहिला प्रकल्प, वरळी ते वांद्रे हा दुसरा प्रकल्प तर या सागरी सेतूचा विस्तार विरारपर्यंत करण्याचा तिसरा टप्पा केला जाणार आहे. त्यातील दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे.