मुंबई : शहरात सध्या कबुतरखान्यांवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी कबुतरखान्यांमुळे कबुतरांची संख्या वाढते आणि त्यातून विशेषतः श्वसनासंबंधित आजारांचा धोका वाढतो असा तक्रारीचा सूर आळवला जात आहे. त्यामुळे कबुतरखाने बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, पक्षीनिरीक्षक आणि तज्ज्ञांचे म्हणणे वेगळेच आहे. कबुतरखान्यांमध्ये दिसणारे पक्षी कबुतर नसून पारवे आहेत, अशी माहिती पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केले आहे.
कबुतरखान्यांमुळे पक्ष्यांची संख्या वाढून श्वसनासंबंधी आजार – विशेषतः हायपरसेंसिटिव्हिटी प्न्युमोनायटिस आणि अस्थमा यांचा धोका वाढतो. त्यामुळे कबुतरखाने बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, एकेकाळी प्रेमपत्र, युद्धातील संदेश पोचवणारे कबूतर आणि कबुतरखान्यांभोवती घुटमळणारे पारवे वेगळे आहेत, असे पक्षीनिरीक्षकांचे म्हणणे आहे.
दिसायला साधर्म्य, पण स्वभाव वेगळा
कबुतर हे चौक, बाजारपेठ, मंदिर परिसरात सहज दिसतात. इतिहासात संदेशवाहक म्हणून प्रसिद्ध असणारे. रंग करडा, पंखांवर काळे डाग, स्वभावाने माणसांशी सरावलेले. पारव्याबद्द्ल सांगायचे तर काँक्रिटच्या सज्जावर, खिडक्यांमध्ये, कधी एसीच्या एक्झॉस्ट जाळीमध्ये ते दिसतात.
दिसण्यात साम्य असल्याने नागरिकांचा गोंधळ उडतो. पारव्यांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, पण कबुतरे बदनाम होतात.
पारव्याच्या विष्ठेतून, पंखांमधून संसर्ग पसरतो, त्याच्यामुळे अनेकांना संसर्ग होतो, रोग बळावतात. त्यांचा माणसाशी इतका जवळचा संपर्क येत असल्याने पक्ष्यांकडून माणसात काही रोगही संक्रमित होण्याचा धोकाही असतो. हे वैद्यकीय अभ्यासावरून सिद्ध झाले आहे.
पारव्यांच्या संख्येत वाढ कशी होते
घरट्याशिवाय राहणे, अंडी घालणे आणि पिल्लांना जन्म देणे हे पारव्याला जमते. धान्य आणि उष्ट्या-खरकट्या अन्नावर तो जगतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे, त्याला विणीसाठी कोणत्याही हंगामाची किंवा पूरक परिस्थितीची आवश्यकता नसते. त्यामुळे पारवा सर्वकाळ पिल्लांना जन्मला घालतो. त्यामुळे वर्षभरात एका जोडीकडून १२ ते १६ नवीन पक्षी जन्माला येतात. शहरी भागात अन्नस्रोत विपुल असल्याने व नैसर्गिक भक्षक कमी असल्याने पिल्लांचे जगण्याचे प्रमाणही जास्त आहे. परिणामी, लोकसंख्या काही वर्षांतच झपाट्याने वाढते. तेच कबुतरखान्यांभोवती दिसतात, ज्यामुळे विष्ठा, पिसे आणि त्यातील सूक्ष्मजीवांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होतो.
संख्या आटोक्यात कशी आणावी
उघड्यावर धान्य टाकणे, कबुतरखान्यातील मुक्त अन्नपुरवठा थांबवणे. कमी अन्न म्हणजे कमी प्रजनन चक्र.
इमारतींमध्ये, फलकांवर, पाईपमध्ये जाळ्या किंवा स्पाईक्स बसवणे.
उघड्यावर पडणारा अन्नकचरा पारव्यांचे मुख्य आकर्षण असते; स्वच्छतेद्वारे हे कमी करता येते.