मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असताना कुर्ला एलबीएस मार्ग येथील कंपनीचा सर्वर हॅक करून डेटा चोरल्याचा प्रकार घडला आहे. डेटा देण्यासाठी आरोपींनी बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले होते. त्या अनुषंगाने नागरी संरक्षण विभागाने कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या डेटाचा सुरक्षित बॅकअप घेण्यास सांगितले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींनी सर्व डेटा एका इनक्रीप्ट फाईलमध्ये साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

कुर्ला येथे मुख्यालय असलेल्या जाहिरात क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या सर्वरमध्ये हॅकर्सने बेकायदा प्रवेश केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तक्रारदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी कंपनीच्या यंत्रणेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी पासवर्ड विसरल्याच्या पर्यायावर क्लिक करून पासवर्ड बदलला. पण कंपनीच्या सर्वरमध्ये कोणताही डेटा उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वरमध्ये काही गैरप्रकार झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संगणक तज्ज्ञांना बोलावले असता कंपनीच्या सर्वरमध्ये एक वर्ड फाईल सापडली.

बिटकॉईनमध्ये खंडणीची मागणी

तुमच्या नेटवर्क अटॅच स्टोरेजमध्ये (नॅस) सुरक्षा भेदण्यात आली आहे. सर्व डेटा इनक्रीप्ट स्वरूपात साठवण्यात आला आहे. महत्त्वाच्या फाईल डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. खाली एक लिंक देण्यात आली होती. डेटा हवा असल्यास संबंधित लिंकवर सव्वाचार लाख रुपये किंमतीची बिटकॉईन जमा करण्यास सांगितले. त्यावेळी कंपनीला ई-मेल आयडी देण्यात आला होता. कंपनीने बिटकॉईनमध्ये खंडणी दिल्यानंतर त्याचे पुरावे एका ई-मेल आयडीवर पाठवण्यास सांगण्यात आले होते.

संदेशात धमकी दिली

आम्ही व्यावसायिक आहोत. बिटकॉईनमध्ये रक्कम एकादाच भरायची आहे. अन्यथा डेटा विसरा, खंडणी दिल्यास भविष्यात सायबर हल्ल्यांपासून कसे स्वतःला वाचवता येईल, याबाबत आम्ही मार्गदर्शनही करू, अशी धमकी संदेशात देण्यात आली होती.

सर्वर हॅक

या संदेशानंतर कंपनीचा सर्वर हॅक करून त्यातील डेटा चोरण्यात आल्याचे कंपनीच्या लक्षात आले. अखेर याप्रकरणी कंपनीने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६५, ६६, ४३ (फ), ४३ (अ) व भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहलगाम हल्ल्यानंतर सायबर हल्ले वाढले

पहलगाम हल्ल्यानंतर देशात १० लाखांहून अधिक सायबर हल्ले झाले आहेत. त्यानंतर नागरी संरक्षण विभागाने युद्धजन्य परिसरातीत कोणती काळजी घ्यावी याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यात कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या डेटाचा बॅक अप घेण्यास सांगितले होते.