मुंबई : मुंबई-ठाण्यातील समस्त गोविंदा पथकांमध्ये गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी उंच दहीहंडी फोडण्याची चुरस लागण्याची शक्यता आहे. काही वेळा रचलेला थर कोसळून गोविंदा जखमी होतात. या जखमी गोविंदाना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मुंबईतील सरकारी रुग्णालये सज्ज झाली आहेत. सर्व रुग्णालयांनी जखमी गोविंदांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक ती औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत.
गोपाळकाल्यानिमित्त मुंबई-ठाण्यासह अन्य भागांमध्ये शनिवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणची गोविंदा पथकांमध्ये मानाची उंच दहीहंडी फोडण्यासाठी चुरस लागते. त्यासाठी रचलेले उंच थर काेसळून अनेक गोविंदा जखमी होतात. जखमी गोविंदांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज झाली आहेत. जे.जे. रुग्णालयामध्ये गोविंदांवर उपचाचरासाठी स्वतंत्र रुग्णकक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. यामध्ये ३० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विभाग व अस्थिव्यंग विभागातही काही खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अपघात विभागामध्ये सर्व सुविधा व औषधे उपलब्ध ठेवण्यात आली असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.
गिरगाव, काॅफ्रर्ट मार्केट, कुलाबा या परिसरात दहीहंडी फोडताना जखमी होणाऱ्या रुग्णांना जी.टी. रुग्णालयामध्ये आणले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जखमी गोविंदा येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी विशेष कक्ष सज्ज करण्यात आला आहे. अस्थिव्यंग विभाग व शस्त्रक्रिया विभागातील डाॅक्टरांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जखमी गोविंदांसाठी सहा खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती जी.टी. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.
सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये येणाऱ्या जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
मुंबई व ठाण्यामध्ये जखमी होणाऱ्या बहुतांश गोविंदांना केईएम रुग्णालयात आणण्यात येते. त्यामुळे या जखमी गोविंदांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी नुकताच सर्व सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये १५ खाटा जखमी गोविंदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अतिदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. तसेच अस्थिव्यंग विभागामध्ये चार खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, जीवनरक्षक प्रणालीही सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी दिली.
दुखापतग्रस्त गोविंदांना गोल्डन अवरमध्ये म्हणजेच पहिल्या ६० मिनिटांत उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबईतील न्यूईरा हॉस्पिटलने मदत क्रमांक ९१७२९७०१११ जारी केला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास जखमी गोविंदांवर त्वरित उपचाराकरिता वैद्यकीय मदत मिळणार आहे. तसेच रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांसाठी १० आपत्कालीन खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जागेअभावी कोणत्याही रुग्णाला उपचारापासून वंचित रहावे लागू नये आणि पीडितांना त्वरित उपचार मिळावेत याची खास काळजी घेण्यात आल्याची माहिती न्यूईरा रुग्णालयातील मज्जातंतू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सुनील कुट्टी यांनी दिली.