मुंबईतल्या ‘प्रिन्सेस स्ट्रीट’वरील ‘दवा बाजार’ ही जवळपास १०० वर्षांपासून सुरू असलेली बाजारपेठ आजही तशीच कार्यरत आहे. अगदी आयुर्वेदिक औषधांपासून अ‍ॅलोपॅथिक औषधांपर्यंतची सगळी औषधे इथे मिळू शकतात. मुंबईतल्या सरकारी रुग्णालयांना इथूनच माल पोहोचवला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील सर्वात जुन्या बाजारांमध्ये मंगलदास मार्केटशेजारील प्रिन्सेस स्ट्रीटवरील ‘दवा बाजार’चे नाव घेतले जाते. सुमारे १९२० साली सुरू झालेला वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचा हा अनोखा बाजार आजतागायत सुरू आहे. अनोखा याचसाठी कारण त्या काळात हा बाजार ‘वैद्यकीय हब’ म्हणून ओळखला जायचा. आजूबाजूला कपडे, घरगुती संसाधने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे या बाजारांमध्ये औषधांचा बाजार येथे सुरू करण्यात आला. आजही या प्रिन्सेस स्ट्रीटवर फिरताना जुन्या इमारती आणि वर्षांनुवर्षे या लाकडांच्या इमारतीतील दुकाने, या दुकानांमध्ये पिढय़ान्पिढय़ा व्यवसाय करणाऱ्या मालकांचे रांगेत लावलेले छायाचित्र या बाजाराच्या इतिहासाच्या खुणा दर्शवितात.

मंगलदास मार्केटला लागूनच दवा बाजाराच्या प्रिन्सेस स्ट्रीटची सुरुवात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंची गाडय़ा उभ्या असलेल्या पाहून आपण कुठल्या तरी पंचतारांकित हॉटेलच्या वाहनतळावर आहोत की काय असा समज होऊ शकतो. मात्र थोडं पुढे गेल्यावर दुकानांवर लावलेल्या पाटय़ांवर आपण औषधांच्या हबमध्ये आल्याचे लक्षात येते. अन्न व औषध प्रशासनाने या भागातील दुकानांचे नऊ झोनमध्ये विभाजन केले आहे. यामध्ये दवा बाजाराचा उल्लेख पहिल्या झोनमध्ये करण्यात आला आहे. प्रशासनाला लक्ष ठेवणे सोपे जावे यासाठी अशा प्रकारचे विभाजन करण्यात आले आहे. प्रिन्सेस स्ट्रीटवरील दवा बाजारातच ५०० हून अधिक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये औषधांच्या कच्च्या मालापासून सर्व प्रकारची वैद्यकीय उपकरणे होलसेल व किरकोळ भावात विकली जातात. राज्यातील औषध कंपन्यांना कच्चा माल पोहोचविणे हे कामदेखील या दुकानांमार्फत केले जाते. याशिवाय मुंबईतील रुग्णालये व औषधांच्या दुकानांमध्ये जाणारा तयार मालही दवा बाजारातून नेला जातो. कच्चा माल ठेवणारे, तयार माल ठेवणारे असे दुकान मालकांनी विभाजन केले आहे. त्याशिवाय येथे औषधी तेल, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, जेनेरिक औषधांची वेगवेगळी दुकाने आहेत. त्याशिवाय खाण्याच्या रंगाची विक्री करणारे येथे मोठे दुकान आहे. दवा बाजारातील या दुकानांमधून मुंबईभरातील खासगी व सरकारी रुग्णालयात माल पोहोचविला जातो. इतर दुकानांमध्ये मिळणारे औषध किंवा वस्तू या दुकानांत निम्म्यापर्यंतच्या दरात दिल्या जातात. त्याशिवाय रुग्णालयाला आवश्यक असलेले उपकरण भारतात उपलब्ध नसेल तर परदेशातील कंपन्यांकडून मागविले जाते.

१९२० ते १९८९ या काळात दवा बाजारातच औषधांचे व वैद्यकीय उपकरणांचे कोठार होते. येथे लाखोंचा माल येथे ठेवला जात होता. मात्र १९८९ मध्ये मुंबई महानगर पालिकेने मालावर जकात कर लावल्यामुळे प्रत्येक मालासाठी पाच टक्क्यांपासून ते सात टक्क्यांपर्यंत जकात भरावी लागत होती.  यामुळे नुकसान होत आहे हे लक्षात आल्यावर सर्वच दुकानदारांनी आपले कोठार भिवंडी, वसई येथे हलविले. त्यामुळे जकातीचा खर्च वाचला असला तरी माल आणणे-नेणे हा खर्च त्यांना करावा लागत आहे. या मालाची ने-आण करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीटच्या फुटपाथवर उत्तर भारतातून आलेले अनेक मालवाहक काम मिळण्याच्या आशेने बसलेले दिसतात. सध्या या रस्त्यावरील एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. जुनी लाकडी संरचना असलेली इमारत पाडून येथे १३ मजल्यांच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. दोन वर्षांपासून हे काम सुरू असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

१९२५ साली दवा बाजारातील दुकानदारांनी असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनच्या माध्यमातून या दुकानदारांच्या एकत्रीकरणाचे काम केले जाते. रुग्णालये व औषध कंपन्यांसोबत ठरलेल्या धोरणातून काम केले जात आहे. यामध्ये माल किती असावा याबाबतची नियमावली ठरविण्यात येते.

औषधे हा आरोग्य सुधारण्याचे माध्यम आहे. त्याशिवाय आपल्या मूलभूत अधिकारांमध्येही अन्न, वस्त्र, निवारा यामध्येही आरोग्याचा समावेश असल्यामुळे दवा बाजारात काम करण्याऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे कायम या बाजाराकडे लक्ष असते. या बाजारात कुठली औषधे आहेत, ते किती दिवस टिकू शकतात, त्याची योग्यता पडताळून पाहणे हे दुकानदारांचे काम असते. यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून या बाजारात कारवाई करण्यात येते.

मीनल गांगुर्डे

@MeenalGangurde

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai dawa bazar in princess street
First published on: 24-05-2017 at 04:38 IST