पुणे : अभियंता तरुणीला झालेल्या गार्टनर्स डक्ट सिस्ट या दुर्मीळ आजारावर पुण्यातील खासगी रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गार्टनर डक्ट सिस्ट ही योनिमार्गामध्ये तयार होणारी गाठ असते. वयस्क महिलांपैकी २५ टक्के जणींमध्ये गार्टनर नलिका असतात आणि त्यातील फक्त १ टक्के महिलांमध्ये त्याचे रूपांतर गाठीमध्ये होते. शस्त्रक्रिया करून ती काढावी लागते.
मॉमस्टोरी बाय सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. मिनी साळुंखे आणि डॉ. गौरी जगदाळे यांनी रुग्ण तरुणीवर मार्सपियलायजेशन प्रक्रिया करुन गाठ काढून टाकली. गार्टनर्स डक्ट सिस्ट गाठीचा सामान्यत: आकार २ सेमीपेक्षा लहान असतो. त्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र लक्षणे जरी दिसून येत नसली तरी या गाठीचा आकार वाढू शकतो. गाठ मोठी असेल तर शस्त्रक्रिया करून ती काढावी लागते. पेल्विक तपासणीद्वारे याचे निदान केले जाते.
अभियंता तरुणीवर करण्यात आलेल्या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या जननेंद्रियाच्या बाह्य मांसल भागास एक छोटा छेद देण्यात आला. यानंतर मार्सुपियालायझेशन या शस्त्रक्रिया तंत्राचा वापर करण्यात आला. अत्यंत नाजुक जागी असलेल्या या गाठीचा आकार ५X५ सेमी होता. सर्वसामान्य प्रकरणांपेक्षा आढळणाऱ्या गाठीपेक्षा तिचा आकार मोठा होता. त्यामुळेच हे प्रकरण दुर्मीळ व आव्हानात्मक होते. या प्रक्रियेनंतर तरुणीच्या तब्येतीत वेगाने सुधारणा झाली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या सहा तासांत त्या पुन्हा चालू शकल्या.
हेही वाचा…एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
गार्टनर्स डक्ट सिस्ट विकार खूप दुर्मिळ आहे. या प्रकरणात गाठीचा मोठा आकार आणि ती असलेली जागा यामुळे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या हालचालींवर फारसा परिणाम होऊ न देता गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात आली. – डॉ मिनी साळुंखे, संचालिका, मॉमस्टोरी बाय सह्याद्री हॉस्पिटल्स