मुंबई: देवनार गाव परिसरात असलेल्या देवनार पाडा स्मशानभूमीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वीजेचे दिवे बंद आहेत. परिणामी तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक तक्रारी देऊनही पालिका तेथे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गोवंडी पूर्वेला असलेल्या देवनार गावाजवळ ही देवनार पाडा स्मशानभूमी असून चेंबूर, गोवंडी आणि देवनार परिसरातील नागरिक तेथे अंत्यविधीसाठी येत असतात. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तेथे लावण्यात आलेले वीजेचे दिवे बंद आहेत. परिणामी अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. मुख्यतः दफनभूमीच्या परिसरातील सर्वच दिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी दफनविधी करण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना मोबाइल, टॉर्चच्या उजेडात दफनविधी पूर्ण करण्याची वेळ येत आहे.

हेही वाचा – मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी लवकरच पर्यटकांच्या सेवेत

हेही वाचा – Coldplay Ticket : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा नोटीस; पण हजर झाले दुसरेच अधिकारी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दुल्ल्यांचा त्रास

या स्मशानभूमीची रेल्वे रुळालगत असलेली संरक्षण भिंत चार वर्षांपूर्वी कोसळली होती. मात्र आद्यपही पालिकेने ही संरक्षण भिंत बांधलेली नाही. परिणामी गोवंडी पश्चिमेला राहणारे अनेक गर्दुल्ले नशा करण्यासाठी या स्मशानभूमीत येतात. सध्या या नशेखोरांनी स्मशानभूमीतच अड्डा तयार केला आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी अनेकदा या गर्दुल्ल्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्यारांचा धाक दाखवत ते कर्मचाऱ्यांच्याच अंगावर धावून जातात. कर्मचाऱ्यांनी अनेकदा याची माहिती एम पूर्व कार्यालयाला दिली आहे. मात्र, आद्याप तरी अधिकाऱ्यांनी भिंत बांधण्याबाबत काहीही तोडगा काढलेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दुल्ल्यांचा वावर तेथे वाढत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.