मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या ७१३ दुकानांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुकानांच्या ई – लिलावाची प्रक्रिया सुरू असून प्रस्तावित वेळापत्रकानुसार २० मार्च रोजी दुकानांचा ई – लिलाव होणार होता. मात्र मुंबई मंडळाने नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे दुकानांचा ई – लिलाव आता २० मार्चऐवजी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

दरम्यान, या दुकानांच्या ई – लिलावाला चांगला प्रतिसाद मिळत असून दुकानांच्या ई-लिलावासाठी आतापर्यंत २७५ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

हेही वाचा – दादरमधील महिलेने अटल सेतूवरून उडी मारली

म्हाडाने रहिवाशांची गरज लक्षात घेऊन गृहनिर्माण प्रकल्पात काही दुकानेही बांधली आहेत. या दुकानांची विक्री ई-लिलाव पद्धतीने म्हाडाकडून केली जाते. दुकानांसाठी म्हाडाकडून निश्चित बोली लावली जाते आणि त्यापेक्षा अधिक बोली लावणाऱ्याला दुकान वितरीत केले जाते.

अशाप्रकारे आतापर्यंत मुंबईतील शेकडो दुकानांचा ई – लिलाव करण्यात आला आहे. परडवणाऱ्या दरात दुकान घेता येत असल्याने या ई-लिलावाला चांगला प्रतिसादही मिळतो. आता अनेक वर्षांनंतर जाहिर करण्यात आलेल्या १७३ दुकानांच्या ई-लिलावालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक हजार इच्छुकांनी यासाठी नोंदणी केली असून अंदाजे ५०० जणांनी अर्ज भरले आहेत. यापैकी २७५ अर्जदारांनी अनामत रक्कमेसह अर्ज दाखल केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – सासू-सासऱ्यांसाठी विवाहितेला बेघर करणे अयोग्य, उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ज्येष्ठ नागरिक कायद्याचा गैरवापर टाळा!

म्हाडाच्या प्रस्तावित वेळापत्रकानुसार २० मार्च रोजी दुकानांचा ई लिलाव होणार होता. मात्र अधिकाधिक इच्छुकांना ई लिलावात सहभागी होता यावे यासाठी मुंबई मंडळाने ई- लिलावाची नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

याआधी १४ मार्च रोजी ही प्रक्रिया संपुष्टात येणार होती. पण आता मुदतवाढ दिल्याने १ एप्रिलपर्यंत इच्छुकांना अर्ज भरून दुकानांच्या ई – लिलावात सहभागी होता येणार आहे. तर ५ एप्रिलला ई- लिलावाचा निकाल जाहिर केला जाणार आहे. दरम्यान या ई – लिलावातून मुंबई मंडळाला १२५ कोटी रुपये महसुलाची अपेक्षा आहे.