मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १७३ दुकानांच्या ई लिलावासाठीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली लावण्याची मुदत सोमवारी रात्री संपुष्टात येणार म्हणताच सोमवारी दुपारी मुंबई मंडळाने या प्रक्रियेला थेट ५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आणि दुकानांच्या ई लिलावाची अर्जसंख्या वाढविण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तर आता नोंदणी, अर्जविक्री, स्वीकृती प्रक्रियाच पुढे गेल्या आता ई लिलावाचा निकाल ५ एप्रिलऐवजी ५ जूननंतर जाहिर केला जाणार आहे.
मुंबई मंडळाने आपल्या गृहप्रकल्पातील दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारीअखेरीस १७३ दुकनांच्या ई लिलावाची जाहिरात प्रसिद्ध करत १ मार्चपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती, बोली निश्चिती अशा प्रक्रियेस सुरुवात केली. जाहिरातीनुसार ही प्रक्रिया १४ मार्च पूर्ण करत २० मार्चला ई लिलावाचा निकाल जाहिर केला जाणार होता. मात्र या प्रक्रियेला मुदतवाढ देत निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार सोमवारी रात्री ११.५९ मिनिटांनी अर्जनोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती आणि बोली लावण्याची मुदत संपुष्टात येणार होती. पण ही मुदत संपण्यास काही तास शिल्लक असतानाच मुंबई मंडळाने नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे.
हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
थेट ५ जूनपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ई लिलावाचा निकाल जाहिर करता येतो की नाही याबाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे आचारसंहितेचा अडसरच नको म्हणत ही मुदतवाढ देण्यात आल्याचे एकीकडे मंडळाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे ई लिलावासाठीची अर्जसंख्या वाढावी या उद्देशानेही मुदतवाढ देण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तेव्हा आता ई लिलाव पूर्व प्रक्रियेला दोन महिन्यांपेक्षा अधिकची मुदतवाढ देण्यात आल्याने ५ एप्रिलला जाहिर होणारा ई लिलावाचा निकालही पुढे गेला आहे. आता ई लिलावाचा निकाल ५ जून नंतर जाहिर केला जाणार असून निकालाची तारीख येत्या काही दिवसांत जाहिर केली जाणार आहे.