मुंबई : संपूर्ण देशभरातून सायबर फसवणुकीच्या माध्यमातून कमवण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचे मनी लॉन्डरिंग करणाऱ्या टोळीची कार्यपद्धती उघड करण्यात सक्त वसुली संचलनालयाला (ईडी) यश आले आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद अब्दुल समद भगत उर्फ ‘चॅलेंजर किंग’ याचा निकटवर्तीय रितेशकुमार सुरेन्द्रकुमार शहा यांच्याविरुद्ध नुकतेच ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. आरोपी शहाने गरीब व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कंपन्या स्थापन केल्या. अशा कंपन्यांच्या बँक खात्यामधून ४०० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून ती रक्कम सायबर फसवणुकीतील असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

ईडीच्या तपासानुसार रितेशकुमार शहा एक सराईत आर्थिक गुन्हेगार असून त्याने विविध गरीब व अनोळखी व्यक्तींच्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट कंपन्या स्थापन केल्या. त्याच नावावर बँक खाती उघडण्यात आली आणि त्याचा वापर करून बेकायदेशीर निधीचे व्यवहार व मनी लॉन्डरिंग करण्यात आले. यामध्ये मालेगाव येथील १४ नामको व ५ बँक ऑफ महाराष्ट्र खात्यांचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर गुन्ह्यातील कोट्यावधी रुपये हस्तांतरित

या बनावट कंपन्यांच्या खात्यांची सखोल तपासणी केली असता, शेकडो कोटी रुपयांचा बेकायदेशीर निधी या खात्यांमध्ये जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याच रकमांपैकी काही रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली, तर काही थेट रोख स्वरूपात काढण्यात आली. विशेषतः ‘हर्ष ट्रेडिंग कंपनी’ व ‘हार्दिक एंटरप्रायझेस’ या दोन खात्यांतून ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४ या दोन महिन्यांत तब्बल २८ कोटी रुपये रोख रक्कम काढण्यात आली, असे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

देशभरातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित

या बँक खात्यांचा वापर भारतातील सायबर गुन्ह्यांमध्ये झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद पोर्टलकडून (एनसीआरपी) या खात्यांवर अनेक नोटीसा जारी करण्यात आल्या असून, देशातील विविध जिल्ह्यांमधील सायबर पोलीस याप्रकरणी चौकशी करीत आहेत.

सराईत आरोपी

रितेश शहा याला २२ डिसेंबर २०२४ रोजी डीजीजीआय, अहमदाबादने अटक केली होती. यापूर्वीही त्याला २०१९ मध्ये गुजरातच्या राज्य जीएसटी विभागाने अटक केली होती. त्याच्यावर १०८ कोटी २८ लाख रुपयांची कर फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान ईडीने हजारो बँक खाती तपासली, आणि अनेक व्यावसायिक ठिकाणी छापे टाकून १५ कोटींची रोख रक्कम जप्त केली. याशिवाय, ९० पेक्षा अधिक बँक खात्यांची चौकशी करून सहा कोटींपेक्षा अधिक रक्कम गोठवण्यात आली. या खात्यांचा वापर हवाला व्यवहार, बोगस देणग्या, रोख व्यवहार, कूट चलन व्यवहार, राजकीय पक्ष व एनजीओसाठी बनावट व्यवहार, परदेशी सॉफ्टवेअर खरेदी इत्यादींसाठी करण्यात येत होता.

मुख्य आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस

मुख्य सूत्रधार मेहमूद अब्दुल समद भगत उर्फ ‘चॅलेंजर किंग’ हा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीर पैशांच्या व्यवहारात सहभागी आहे. त्याने शेकडो कोटींचे साखळी व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याने स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावावर सूरतमधील ‘अल-नूर रेसिडेन्सी’मध्ये अनेक स्थावर मालमत्ता जमा केल्या आहेत. त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी पथकाने रेड कॉर्नर नोटीसही जारी केली आहे.

पुरवणी आरोपपत्र

सक्त वसुली संचलनालयाने १४ मे रोजी विशेष पीएमएलए न्यायालयापुढे रितेशकुमार शहा विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आरोपी ‘चॅलेंजर किंग’च्या सूचनेनुसार बनावट कंपन्या स्थापन करीत होता. या टोळीने गुंतवणूक फसवणूक, डिजिटल अटक, ऑनलाइन गेमिंग, बेकायदेशीर विदेशी चलन व्यवहार अशा विविध सायबर गुन्ह्यांद्वारे लोकांकडून पैसे उकळून, बनावट कंपन्यांच्या बँक खात्याद्वारे ती रक्कम व्यवहारत आणण्याचा प्रयत्न केला होता.