मुंबईतील परळ भागात असलेल्या टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाच्या तळमजल्यावर आज आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली.

मुंबईत गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळीही मुंबईतील परळ भागातील टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या तळमजल्यावर भीषण आग लागली. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. काही वेळाने अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि चार पाण्याचे टँकरही घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातील आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. आग कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीत सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत चाळीसहून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यात पश्चिम उपनगरांमध्ये आगीच्या सर्वाधिक घटना घडल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. मुंबई शहरात १२ ठिकाणी तर पूर्व उपनगरामध्ये १२ आणि पश्चिम उपनगरांमध्ये १८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यात दोन गगनचुंबी इमारतींमध्येही आगी लागल्या होत्या. त्यानंतर डिसेंबरमध्ये मुंबईतील भायखळा परिसरातील झोपडपट्टीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. त्यात १५ ते २० झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या १४ गाड्यांच्या मदतीने शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश आले होते. या आगीमध्ये अग्निशमन दलाचा अधिकारी आणि एक महिलाही जखमी झाली होती. त्याच्या दोनच दिवसांपूर्वी सायनमधील प्रेमनगर झोपडपट्टीतही आग लागली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.