मुंबई : गेल्या काही वर्षात बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून गेली काही वर्षे वसई तालुक्यातील भालिवली गावातील आदिवासी महिला बांबूपासून राख्या तयार करत आहेत. गेली दहा ते बारा वर्षे त्यांना राख्यांच्या माध्यमातून रोजगाराचे साधन मिळाल्याने अनेक घरांचे आर्थिक गणित सावरु लागले आहे. भालिवली गावातील आदिवासी महिला गेली १० ते ११ वर्षे बांबूपासून हाताने राख्या तयार करत आहेत. या उपक्रमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागतो आहे.
भालिवली गावात १० ते १२ आदिवासी पाडे आहेत. गरजू महिलांना आणि त्यातूनच प्रामुख्याने आदिवासी महिलांना घरकामाबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने विवेक राष्ट्रसेवा समिती संस्थेने पुढाकार घेत महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून दिडशेहून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिला दरवर्षी बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनवतात. राख्यांची किंमत प्रत्येकी ३० ते ५० रुपये इतकी आहे.
बांबूच्या राख्या तयार करण्यासाठी बांबूच्या सालीचा, नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. या साहित्यातून आदिवासी महिला राखी तयार करतात. त्यात विविध नक्षीकाम केलेल्या राख्या उपलब्ध आहेत. दरम्यान, या राख्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पर्यावरणासाठी काम करणारी ‘पर्यावरण दक्षता मंडळ’ ही गेल्या काही वर्षांपासून करत आहे. पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेली पर्यावरण दक्षता मंडळ संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करीत आहे. संस्थेच्या ‘ग्रीन शॉपी’ उपक्रमांतर्गत बांबूच्या पर्यावरणपूरक राख्या उपलब्ध आहेत. याच उपक्रमांतर्गत आदिवासी महिलांना दरवर्षी रोजगार मिळतो. याचबरोबर पर्यावरण जनजागृतीही केली जाते.
अमरावती येथील बांबू केंद्रातूनही पर्यावरणपूरक राखी अमरावती येथे सुनील देशपांडे यांचे बांबू केंद्र आहे. त्या संपूर्ण बांबू केंद्राच्याही राख्या पर्यावरण दक्षता मंडळाकडे उपलब्ध असतात. पर्यावरणपूरक राख्यांची सुरुवात ही सुनील देशपांडे यांनी केली असून त्यांच्याच केंद्रातील लोकांनी भालिवलीतील महिलांना प्रशिक्षण दिले होते.
पर्यावरण दक्षता मंडळ हे नेहमीच पर्यावरणाबाबत जनजागृती करत असते. पर्यावरणपूरक राखी हा देखील त्याचाच एक भाग आहे. पर्यावरणासाठी घातक असलेल्या राख्यांचा वापर करण्याऐवजी पर्यावरणपूरक राखीचा वापर करावा. आदिवासी महिलांना रोजगार मिळावा तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा यामागील मूळ उद्देश आहे. सुरभि वालावलकर ठोसर , पर्यावरण दक्षता मंडळ