मुंबई : राज्यातील बहुतांश मोठ्या रुग्णालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व अतिदक्षता विभागामध्ये आयुष डॉक्टरांमार्फत सेवा पुरवली जाते. ही सेवा घेताना इंडियन मेडिकल असोसिशनला (आयएमए) कोणताही आक्षेप नाही, मात्र होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला विरोध करण्यात येतो. यावरून आयएमए होमिओपॅथी डाॅक्टरांची बदनामी आणि दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रसारित करून सरकारची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची रद्द करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी या मागणीसाठी १६ जुलैपासून राज्यातील होमिओपॅथी डॉक्टर आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत.
मंत्रिमंडळाने ९ जानेवारी २०१४ रोजी मंजुरी देऊन राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये (ॲलोपॅथी) व्यवसाय करण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यासाठी एक वर्षाचा आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण करण्याची अट घालण्यात आली होती. विधि मंडळाच्या जून २०१४ च्या अधिवेशनामध्ये याला दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली. यामध्ये होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ॲक्ट १९६० मध्ये बदल करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची परवानगी व एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम करण्यासाठी परवानगी देण्यात आली.
सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणी करण्याची मुभा देण्यात आली. एमएमसीमध्ये नोंदणीसाठी स्वतंत्र पुस्तिका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जुलै २०१४ पासून हा कायदा राज्यामध्ये अमलात आला. मात्र यासंदर्भात आयएमएने न्यायालयात धाव घेतल्याने मागील १० वर्षांपासून होमिओपॅथी डॉक्टरांची कोणतीही नोंदणी करण्यात आली नव्हती. मात्र राज्य सरकारने १५ जुलै २०२५ पासून याची अमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आयएमएने जोरदार विरोध केल्याने अखेर राज्य सरकारने नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
सरकारचा हा निर्णय राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय करणार आहे. त्यामुळे एमएमसीमधील सीसीएमपी अभ्यासक्रमाची रद्द करण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनने (हिम्पाम) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एमएमसीमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणामध्ये राज्यातील हजारो डॉक्टस सहभागी होणार असल्याची माहिती होमिओपॅथी परिषदेचे माजी सदस्य डॉ. बाहुबली शहा यांनी दिली.