मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून लोखंडी सळई खाली पडल्याने सात वर्षांची मुलगी जखमी झाली. मालाडच्या कुरार परिसरात ही घटना घडली. जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार कऱण्यात आले. कुरार गाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मालाड (पूर्व) येथील कुरार गावातील लक्ष्मण नगर परिसरात एका झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी शिवप्रसाद नावाची एक चाळ आहे. या चाळीतील मुले रविवारी दुपारी परिसरात खेळत होती. दुपारी २ च्या सुमारास एका कामगाराच्या हातून एक लोखंडी सळई खाली पडली. त्यावेळी खाली खेळत असलेल्या इशान्वी मांजलकर (७) या मुलीच्या अंगावर सळई पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकासकाने काम करताना कुठल्याही सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नव्हत्या तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी संरक्षक जाळीही लावण्यात आली नव्हती, असे मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सोमवारी कुरार गाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५ (अ) आणि ३२४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.