कुलदीप घायवट

जगातील सर्व सजीवांमध्ये कीटकांनी सर्वात मोठा भाग व्यापलेला आहे. संपूर्ण जैवविविधतेच्या सुमारे ५० टक्के कीटक आहेत. मात्र, कीटकांचा अभ्यास इतर सजीवांच्या तुलनेत कमी होतो. बहुतेक प्रजातींबाबत कमी माहिती ज्ञात आहे. विविध प्रकारच्या कीटकांमध्ये फुलपाखरे हे त्यांच्या रंगसंगतीमुळे, विशिष्ट शारीरिक रचनेमुळे मानवाला आकर्षित करतात. फुलपाखरू हा त्याच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेणारा कीटक आहे. बालपणात या नाजूक, सुंदर कीटकाचा पाठलाग केल्याच्या आठवणी हा प्रत्येकाकडील ठेवा असतो. बोरिवली येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागूनच असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात शिरल्यावर काही काळाने शहरातील कोलाहल मागे पडत जातो. थंडगार हवा शरीराला जाणवू लागते. वाहनांच्या आवाजाऐवजी विविध पक्ष्यांचा आवाज कानी पडतो. मातीचा, ओल्या गवताचा वास श्वासाद्वारे नाकात शिरतो. चहूबाजूला हिरवीगार झाडी दिसते. प्राणी, विविध रंगांचे, आकारांचे पक्षी दिसू लागतात. राष्ट्रीय उद्यानाची ओळख करून देण्यासाठी बांधण्यात आलेल्या निसर्ग माहिती केंद्राच्या आवारात फुलपाखरू उद्यान आहे.

राष्ट्रीय उद्यानातील हे जंगल मिश्र उष्ण कटिबंधीय पर्णपाती प्रकारचे आहे. साग, पळस, काटेसावर, ऐन, बांबू आणि इतर पानझडी वृक्षांचे येथे प्राबल्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जसे सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या वेगवेगळय़ा जातींसाठी प्रसिद्ध आहे तसे हे संरक्षित राष्ट्रीय उद्यान वेगवेगळय़ा फुलपाखरांच्या प्रजातींचे घर आहे. राष्ट्रीय उद्यानात २७४ पक्ष्यांच्या प्रजाती, ३५ ते ४० वन्य प्राणी आणि १ हजार ३०० हून अधिक प्रकारची झाडे-झुडपे आहेत, तर फुलपाखरांच्या १६० हून अधिक प्रजाती असून प्रत्येक प्रजातीच्या फुलपाखरांची सभा राष्ट्रीय उद्यानात भरत असते.  महाराष्ट्रात सापडणारे सर्वात लहान फुलपाखरू म्हणजे ओरिएंटल ग्रास ज्वेल ते महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, सुकलेल्या पानांत लपून पानाशी अनुकूल होणारे ब्लू ओक लिफ, चमकदार कॉमन जेझेबल्स, मासतोडीवर फिरणारा ग्रेटर ऑरेज टीप, द कॉमन टायगर, कॉमन क्रो, बिबटय़ासारखे ठिपके असलेला कॉमन लेपर्ड किंवा स्पॉटेड रस्टिक, ब्लू टायगर, ग्रे पॅन्झी, द कॉमन जॅझबेल, द डार्क ब्रॅण्डेड बुशब्राऊन, द कॉमन एमिग्रंट, द टेल्ड जे, द ग्रेट ऑरेंज टिप ही राष्ट्रीय उद्यान आणि मुंबईभोवताली अगदी दृष्टीस पडणारी काही फुलपाखरे. जगातील सर्वात मोठे असे अ‍ॅटलास मॉथही राष्ट्रीय उद्यानात सापडते. अळीचे चार टप्प्यांनंतर फुलपाखरू होते. अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ. प्रौढ फुलपाखरे बहुतेक वेळा विशिष्ट जातींच्या झाडांच्या पानावर अंडी घालतात. अशा झाडांना ‘होस्ट प्लांट’ म्हणतात. उद्यानात मिळणाऱ्या ४०० पेक्षा जास्त वनस्पती फुलपाखरांच्या जातीसाठी होस्ट प्लांट म्हणून कामी येतात. अंडय़ातून बाहेर पडणारी अळी किंवा सुरवंट त्याच्या होस्ट झाडाची पाने किंवा फुले खाऊन वाढतात. त्यांच्या वाढीच्या टप्प्यावर जुनी त्वचा अनेक वेळा वाळते. कोश तयार होईपर्यंत सुरवंटाचा आकार अनेक पटींनी वाढतो. सुरवंट स्वत:ला एका फांदीला जोडते आणि स्वत:भोवती आवरण तयार करते, तोच फुलपाखराचा कोश. एका विशिष्ट वेळानंतर कोशाच्या आतील सुरवंटाचे फुलपाखरू होते.