मुंबई: यंदा मोसमी पाऊस वेळेपूर्वीच मुंबईत दखल झाल्याची माहिती हवामान विभागाने सोमवारी दिली. गेल्या आठवड्यापासूनच आगमनाची वर्दी देणारे मोसमी वारे मुंबईत सोमवारी दाखल झाले. पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांची दैना केली आहे. गेल्या जवळपास ६९ वर्षांच्या नोंदींनुसार मुंबईत यंदा सर्वांत लवकर पाऊस दाखल झाल्याचे दिसते आहे.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करून १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात पोहोचतो.

यंदा मात्र, मोसमी पाऊस अंदाजित वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी तळकोकणात मोसमी पावसाचे आगमन झाले आणि सोमवारी मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. यंदा १५ दिवस अगोदरच मोसमी पाऊस दाखल झाला आहे. सामान्यतः मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होते.

मोसमी पाऊस दाखल म्हणजे काय?

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते.

गेल्या वर्षीही लवकरच…

गेल्या वर्षी मोसमी पाऊस मुंबईत ९ जून रोजी दाखल झाला होता. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा एक दोन दिवस आधी पाऊस आला होता. २०२३ मध्ये उशिरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१- ९ जून, तर २०२० मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता.

यंदा सरासरीपेक्षा जास्त

संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नाही. हिंदी महासागरीय द्विध्रुविताही तटस्थ आहे. डिसेंबर – मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झालेली वर्ष

१९५६-२९ मे

१९६२-२९ मे

१९७१- २९ मे

१९९०-३१ मे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००६- ३१ मे