मुंबई : राज्य सरकार, काही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेते मंडळींकडून गोकुळाष्टमीनिमित्त सराव करणाऱ्या आणि प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवशी गोविंदांना विम्याच्या संरक्षणाचे कवच उपलब्ध करून देण्यात येते. मात्र थर कोसळून जखमी होणारे गोविंदा अथवा त्यांच्या पथकांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने, अज्ञान, धरसोड वृत्ती, पाठपुराव्याचा अभाव, विम्याच्या दाव्यांमधील त्रुटी आदी विविध कारणांमुळे आजतागायत अनेकांना विम्याच्या रकमेपासून वंचित राहावे लागले आहे. गतवर्षी विम्याच्या रकमेसाठी दावा केलेल्या १२२ पैकी केवळ ३९ जखमी गाविंदांनाच आर्थिक मदत मिळाली होती. त्यामुळे आता केवळ विम्याचे संरक्षण मिळवून उपयोग नाही, तर प्रत्यक्षात आर्थिक मदत पदरात पडण्यासाठी प्रभावी जनजागृतीची आवश्यकता आहे.

श्रावण सरींना सुरुवात होताच मुंबईत गोकुळाष्टमी, गणेशोत्सवाची चाहुल लागते. मुंबई-ठाण्यातील अनेक गोविंदा पथकेच रात्रीचा जागर करीत उंच दहीहंडी फोडण्याच्या सरावत व्यग्र असतात. दैनंदिन कामकाज सांभाळून तरुण मंडळी नित्यनेमाने रात्री थर रचण्याच्या सरावाला उपस्थित राहतात. अनेक वेळा थर रचण्याचा सराव करताना छोटे-मोठे अपघात होतात. त्यात जखमी झालेल्या गोविंदांवर रुग्णालयात उपचार करण्यात येतात. गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच दहीहंडी फोडण्याची गोविंदा पथकांमध्ये अहमहमिका लागते. गोविंदा बेभान होऊन उंच दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी आठ, नऊ थर रचण्याचा अट्टाहास करतात आणि थर कोसळल्यानंतर त्यांच्या जीवावर बेतते. अनेकांना छोट्या-मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागते.

८३ गोविंदा मदतीपासून वंचित

राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहकी क्रीडा प्रकाराचा दर्जा देतानाच गोविंदांना विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील काही वर्षांपासून द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे गतवर्षीही या कंपनीतर्फे मोठ्या संख्येने गोविंदा पथकांना विम्याचे संरक्षण देण्यात आले होते. गतवर्षी थर कोसळून मोठ्या संख्येने गोविंदा जखमी झाले होते. द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी जखमी गोविंदांनी सुमारे १२२ दावे दाखल केले होते. दाखल केलेल्या दाव्यासाठी काही कागदपत्रेच जोडण्यात आली नव्हती. तर काही गोविंदा विम्याचा दावा दाखल करून गणेशोत्सवासाठी गावाला निघून गेले होते. त्यामुळे केवळ ३९ दावे मंजूर झाले आणि संबंधितांना पैसे मिळू शकले. मात्र त्रुटींमुळे दावे मंजूर होऊ न शकल्याने ८३ गोविंदाना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले होते.

जनजागृतीची गरज

गेल्या वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा झाला. ठिकठिकाणी लाखमोलाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती. मोठ्या रकमेचे पारितोषिक मिळविण्यासाठी लहान गोविंदा पथके क्षमतेपेक्षा अधिक उंच थर रचण्याचा अट्टाहास

करतात. काही वेळ थर कोसळून गोविंदा जखमी होतात. अशा गोविंदांच्या पथकाने विम्याचे कवच घेतले असल्यास जखमींना आर्थिक मदत मिळू शकते. मात्र बहुसंख्य पथके विम्याचे संरक्षण मिळवतात. परंतु जखमी गोविंदा अथवा त्याच्या पथकाला विम्याचा दावा कसा दाखल करावा याची कल्पनाच नसते. विम्याच्या दाव्यासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करायची याचीही त्यांना कल्पना नसते. त्यामुळे दाखल केलेल्या दाव्यात त्रुटी राहते आणि विम्याच्या पैशांपासून जखमी गोविंदांना वंचित राहावे लागते. बहुसंख्य गोविंदा छोटी-मोठी नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु थर कोसळून जायबंदी झाल्यानंतर योग्य वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसतात. अशा वेळी संबंधितांच्या कुटुंबियांसमोर आर्थिक संकट उभे राहते. त्यामुळे विम्याचा दावा कसा सादर करावा, पैसे कसे मिळवावे यासंदर्भात जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

विम्याचा दावा दाखल करताना विमा संरक्षण घेतल्याच्या प्रमाणपत्राची प्रत, विम्याचे संरक्षण असलेल्या गोविंदांची यादी, वैयक्तिक अपघात दाव्याच्या अर्जावर संबंधित मंडळ, तसेच डॉक्टरचा शिक्का, उपचारादरम्यान रुग्णालयाकडून मिळालेली सर्व कागदपत्रे, बिले, एक्सरे, चाचण्यांचे अहवाल, बिलांची मुळ प्रत, गुन्हा दाखल झाला असल्यास त्याची प्रत, जखमी गोविंदाचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खात्याचा तपशील आदी माहिती कागदपत्रांसह सादर करणे नितांत गरजेचे आहे. यापैकी काही कागदपत्रे जोडण्यात आली नाहीत तर दाव्यात त्रुटी राहते आणि त्यामुळे विम्याचे पैसे मिळू शकत नाहीत, असे विमा कंपनीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.