मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड येथील अक्सा समुद्र किनाऱ्यावरील समुद्र भिंत आणि पदपथाचा भाग गुरुवारी मुसळधार पावसामुळे पूर्णत: खचला. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बांधलेल्या या पदपथाचा काही भाग गेल्या आठवड्यातही खचला होता. हा पदपथ गुरुवारी समुद्री भिंतीसह खचला. त्यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयाने रस्ता रोधक (बॅरिकेड) उभे करून तेथे नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.
मुंबईतील मालाड येथील अक्सा समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने बांधलेल्या ६०० मीटर लांबीच्या समुद्री भिंतीवरील पदपथाचा काही भाग भरतीच्या पाण्यामुळे गेल्याच आठवड्यात खचायला सुरुवात झाली होती. समुद्रकिनाऱ्याच्या मधोमध बांधलेल्या या भिंतीमुळे सीआरझेड नियमाचे उल्लंघन झाल्याचा दावा काही महिन्यांपूर्वी पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे केला होता. त्यामुळे या दुर्घटनेचे गांभीर्य वाढले आहे.
हेही वाचा…मुंबई : वरळीतील स्पा हत्येप्रकरणी दोघांना अटक, तिघे ताब्यात सुपारी घेऊन हत्या केल्याचा संशय
महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाने सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, तसेच जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने अक्सा समुद्रकिनाऱ्यावर समुद्री भिंत बांधली होती. अक्सा किनाऱ्यावर बांधलेल्या समुद्री भिंतीला पर्यावरणतज्ज्ञांनी यापूर्वीच विरोध केला होता. मढमधील अक्सा समुद्रकिनारा सीआरझेड अधिसूचना, २०११ अंतर्गत सीआरझेड १ क्षेत्राच्या श्रेणीत येतो.