मुंबई : मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या आरोपाप्रकरणी मीरा रोड येथील हॉटेल व्यावसायिक सुरेश शेट्टी याला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला. मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या आरोपाप्रकरणी मीरा रोड येथील काशीगाव पोलिसांनी शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, शेट्टी याने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आधी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, तेथे दिलासा न मिळाल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती.

न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकलपीठाने शेट्टी याची अटकपूर्व जामिनाची मागणी फेटाळली. तो तपासात सहकार्य करत नाही. तसेच, अल्पवयीन पीडितांशी संबंधित अशाच प्रकारच्या आणखी एका गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे सकृतदर्शनी उघड झाले आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता शेट्टी याला अटकेपासून संरक्षण देता येणार नाही, असे एकलपीठाने त्याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

शेट्टी याने अटकपूर्व जामिनाची मागणी करताना केलेले दावेही न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर, दोन आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी शेट्टी याच्याकडून करण्यात आली. तीही न्यायालयाने अमान्य केली. त्यानंतर, याचिका मागे घेण्याची विनंती शेट्टी याने न्यायालयाकडे केली. तथापि, आरोपांचे गांभीर्य आणि पोलिसांनी सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन शेट्टी याची ही मागणीही मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला.

प्रकरण काय ?

मीरा रोड येथील हॉटेल साई रेसिडेन्सीवर टाकलेल्या छाप्यादरम्यान मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाचे हे प्रकरण उघडकीस आले. छाप्यादरम्यान दोन अल्पवयीन मुलींसह चौघींची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. तर हॉटेल अँक्वाचा संचालक आणि हॉटेल साई रेसिडेन्सीच्या शेट्टी याला फरारी दाखवण्यात आले. हॉटेलच्या तीन कर्मचाऱ्यांकडे केलेल्या चौकशीत शेट्टी याचा या प्रकरणी सहभाग असल्याचे पुढे आले, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मीरा रोड परिसरातील अशाच प्रकारच्या तस्करीच्या प्रकरणातही त्याला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आल्याचे पोलिसातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्याच्या याचिकेला विरोध करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचा दावा

हॉटेल साई रेसिडेन्सीच्या खात्यातून ११ डिसेंबर २०२४ रोजी २५ हजार रुपये शेट्टीच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. याबाबतच्या चौकशीसाठी पोलिसांनी शेट्टी याला बोलावले होते. परंतु, तपासात कोणतेही सहकार्य न करता तो फरारी झाला, असा पोलिसांचा दावा आहे. जबाब आणि हॉटेल व्यवस्थापकाच्या मोबाइलमध्ये सापडलेले पुरावे शेट्टी याचा या कथित प्रकरणाशी संबंध दर्शवत असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे.