मुंबई : चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) प्रकल्पामधील वायू गळतीच्या घटनेसह अलिकडच्या वायू गळतीच्या घटनांची उच्च न्यायालयाने मंगळवारी स्वतःहून दखल घेतली. यासंदर्भात विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पुढील तपासणीसाठी बाधित भागात पाठवले जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

चेंबूर येथील आरसीएफ प्रकल्प भागात सोमवारी सकाळी झालेल्या वायूगळतीमुळे रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळे, त्वचा जळजळ होणे आणि मळमळ होणे, अशी लक्षणे आढळून आली. या वायू गळतीमुळे परिसरात तीव्र रासायनिक वास आणि दाट धुके पसरले होते. दुसऱ्या एका घटनेत पालघर मधील तारापूर एमआयडीसी येथे असलेल्या आरती ड्रग्ज लिमिटेड कंपनीत वायू गळती झाली होती. त्यामुळे सालवाड आणि शिवाजीनगरमधील रहिवाशांमध्ये भीती पसरली होती.

कंपनीत उत्पादनादरम्यान हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या (एचसीएल) कथित गळतीमुळे धुराचे प्रमाण वाढले आणि त्यामुळे नागरिकांनी डोळे आणि घशात जळजळ होत असल्याच्या तक्रारी केल्या. घबराट निर्माण होऊन स्थानिकांना त्यांची घरे रिकामी करावी लागली होती.

वायू गळतीच्या धोकादायक घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या बातम्यांच्या वृत्तांचा दाखला देऊन मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. आम्ही वायू गळतीसंदर्भातील तीन बातम्यांची दखल घेत आहोत. तुम्हाला नोटीस देण्यात आली आहे, असे खंडपीठाने म्हटले. तसेच, विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पुढील तपासणीसाठी बाधित भागात पाठवले जाईल, असे स्पष्ट केले.

यापूर्वी, २१ ऑगस्ट रोजी, पालघरच्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली कंपनीत वायू गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.