मुंबई : मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल, असा बहाणा करून विलेपार्ले येथील एका रेस्टॉरंट मालकाकडून ८२ लाख रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या दलालाला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास उच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला.
याचिकाकर्ता पवन मुत्रेजा याच्यावरील आरोप लक्षात घेता त्याने सहआरोपी परेश शहा आणि प्रकाश व्यास यांच्या साथीने फसवणुकीचा व्यापक फौजदारी कट रचल्याचे स्पष्ट होते, असे सकृतदर्शनी निरीक्षण न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने नोंदवले. तसेच, मुत्रेजा याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. गीता रेस्टॉरंटचे मालक जयप्रकाश शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे विलेपार्ले पोलिसांनी १४ एप्रिल रोजी याचिकाकर्त्यासह अन्य आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, मालमत्ता हस्तांतरणासाठी महापालिका अधिकाऱ्यांना ८२ लाख रुपयांची लाच द्यावी लागेल. त्यातील ५० लाख रुपये बँकेत वर्ग करावे लागतील, तर उर्वरित ३२ लाख रुपये रोख स्वरूपात द्यावे लागतील, असे याचिकाकर्त्याने शेट्टी यांना सांगितले. शेट्टी यांनी दिलेल्या रकमेपैकी साडेनऊ लाख रुपये थेट मुत्रेजा याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले व आणखी साडेनऊ लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले.
तथापि, आईच्या कर्करोगावरील उपचारांसाठी आपण सहआरोपी व्यास याच्याकडून ही रक्कम कर्ज म्हणून घेतली होती, असा दावा मुत्रेजा याने केला. न्यायालयाने मात्र त्याचा हा दावा पटण्यासारखा नसल्याचे नमूद केले. आपल्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी मुश्रेजा याने कोणतेही कागदोपत्री पुरावे सादर केले नसल्याचीही नोंद एकलपीठाने घेतली व त्याचा दावा संशयास्पद असल्याची टिप्पणी केली.
आरोपीचा दावा खोटा
या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचा मुत्रेजा याचा दावा चुकीचा असल्याचे दर्शवताना न्यायालयाने २२ जानेवारी २०२५ रोजी व्हॉट्स ॲपवरून करण्यात आलेल्या संदेशांकडे आणि सामंजस्य कराराकडेही लक्ष वेधले, त्यानुसार, तक्रारदार आणि सह-आरोपी व्यास यांच्याशी मुत्रेजा हा व्हॉट्स ॲपवरून पैशांसदर्भात बोलत होता. त्यामुळे, सहआरोपींशी आपला संबंध नसल्याचा खोटा दावा असल्याचे सकृतदर्शनी मतही एकलपीठाने व्यक्त केले.
दिलासा देणे ही न्यायाची थट्टा ठरेल
मुत्रेजा याने तक्रारदाराच्या मुलीला फोन करून तिच्याकडे महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी पैशांची मागणी केली होती. या संभाषणाचे ध्वनीमुद्रण पोलिसांनी न्यायालयात सादर केले. याचीही न्यायालयाने दखल घेतली. तसेच, मुत्रेजा याला अटकेपासून संरक्षण दिले तर तो साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, मुत्रेजा याच्यावर आधीच सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे, त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्यास ती न्यायाची थट्टा ठरेल, असेही न्यायालयाने मुत्रेजा याला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.