करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबईत मोठया प्रमाणात जंबो आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून अजूनही काही भागांमध्ये हे सेंटर उभे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पण प्रत्यक्षात या आयसोलेशन सेंटरचा म्हणावा तितका वापर होत नाहीय. मुंबईत दररोज करोना रुग्णांची संख्या वाढतेय पण त्या तुलनेत आयसोलेशन सेंटर्स अजूनही रिकामी आहेत. डॉक्टर आणि नर्सेसच्या कमतरतेमुळे या आयसोलेशन सेंटरचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाहीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच आयसोलेशन सेंटरमध्ये मिळून ३ हजार बेडस उपलब्ध आहेत. पण तिथे फक्त ५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गोरेगाव नेस्को येथे सर्वात मोठे १२४० बेडचे जंबो आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. पण तिथे फक्त ५० रुग्ण दाखल आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल येथे १०८० बेडसचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आलं आहे. पण तिथे एकही रुग्ण नाहीय. महालक्ष्मी रेसकोर्स येथे ३५० बेडचं आयसोलेशन सेंटर आहे. ते अजून रुग्णांसाठी सुरु झालेलं नाही. मुंबई मिररने हे वृत्त दिलं आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढूनही हे आयसोलेशन सेंटर रिकामी राहत असल्यामुळे हे सेंटर्स पांढरा हत्ती ठरतील असा आरोप विरोधक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. डॉक्टर आणि नर्सेसच्या कमतरतेशिवाय पावसाळयात काही सेंटर्सचा उपयोगही करता येणार नाही असा विरोधकांचा दावा आहे.

सरकारकडून मुलुंड, बीकेसी आणि दहीसर येथे अशाच आयसोलेशन सेंटर्सची उभारणी सुरु आहे. करोनाची लागण झालीय पण कुठलीही लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना इथे ठेवण्यात येईल. वाईटातल्या वाईट स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडून तयारी सुरु आहे असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. “रुग्ण संख्या वाढल्यास ४ ते ५ हजार बेडसची आवश्यकता लागू शकते. लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्यामुळे लोक घराबाहेर पडणार. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या वाढू शकते” असे अस्लम शेख म्हणाले.

मुंबई महापालिकेने काय म्हटलं आहे?

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अधिक क्षमतेच्या उपचार केंद्रांमध्ये (Jumbo facility) खाटा रिकाम्या असल्याच्या बातम्या आज काही प्रसारमांध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे खुलासा करण्यात येत आहे की, सदरहू अधिक क्षमतेची उपचार केंद्रे ही महापालिकेच्या सर्वंकष नियोजनाचा भाग आहेत. या उपचार केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी टप्प्याटप्प्याने रुग्ण पाठविण्यात येत आहेत. तसेच अनपेक्षितपणे उद्भवलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून यापूर्वीच कार्यरत झालेल्या उपचार केंद्रांमधील रुग्णांना इतर ठिकाणी असलेल्या पक्या बांधकामाच्या उपचार केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. तथापि, आता चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर ही उपचार केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. ही बाब लक्षात घेता, तसेच ही उपचार केंद्रे प्रामुख्याने सर्वंकष नियोजनाचा भाग आहेत; हा मुद्दाही लक्षात घेता, ‘या केंद्रांमधील खाटा रिकाम्या आहेत’, असे म्हणणे गैर लागू ठरते.

‘करोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर बृहन्मुंबई महापालिकेची ४ प्रमुख सर्वोपचार रुग्णालये, १६ उपनगरीय रुग्णालये इत्यादी ठिकाणी प्रभावी वैद्यकीय उपचार नियमितपणे करण्यात येत आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राची गरज लक्षात घेऊन मबईच्या तीनही भागांमध्ये म्हणजेच शहर भाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे या परिसरात अधिक क्षमतेची वैशिष्ट्यपूर्ण उपचार केंद्रे देखील उभारण्यात आली आहेत. ही उपचार केंद्रे प्रामुख्याने वैद्यकीय सेवा सुविधांच्या गरजांचा अंदाज घेऊन करण्यात आलेल्या सर्वंकष नियोजनाचा भाग आहेत. या उपचार केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी इत्यादींचा समावेश असलेल्या मनुष्यबळाची नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. तसेच यापुढेही त्या-त्या वेळच्या गरजांनुसार या ठिकाणी आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उभारण्यात आलेल्या अधिक क्षमतेच्या उपचार केंद्रांचा अधिकाधिक परिपूर्ण उपयोग व्हावा, या दृष्टीने महापालिका प्रशासनाच्या स्तरावर परिपूर्ण व टप्पा निहाय नियोजन करण्यात आले आहे. सदर नियोजनानुसार आवश्यक ती कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे नियमितपणे व सातत्याने केली जात आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai higher number of corona patient but most isolation centres vaccant dmp
First published on: 05-06-2020 at 14:50 IST